नारद पुरस्कार प्रसंगी प्रशांत दीक्षित यांचे विवेचन

पुणे,दि.3(प्रतिनिधी) ˆ आपल्या देशावर गेल्या काही शतकात जी आक्रमणे झाली त्यांचे त्या आक्रमणामागे काय तत्वज्ञान होते हे समजावून घेतले पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी येथे देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. श्री प्रशांत दीक्षित यांना रविवारी पुण्यात ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या हस्ते नारद पत्रकारिता पुरस्तार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार विश्व संवाद केंद्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने देण्यात आले. इंडिया टीव्हीचे पुणे विभागाचे ब्युरोचीफ श्री अजय कांबळे यांना गप्पाष्टककार संजय उपाध्ये यांच्या हस्ते युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वसंवाद केंद्र पुणे चे निमंत्रक मनोहर कुलकर्णी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. मुख्य पुरस्कार अकरा हजार रुपये व सन्मान चिन्ह असे असून युवापुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे.

श्री प्रशांत दीक्षित म्हणाले, गेली एक हजार वर्षे जगात आक्रमणाची व अन्य देशावर साम्राज्य करण्याची गेली. गेल्या पाचशे वर्षात तर युरोपीय देशांनी सार्‍या जगावर आक्रमण केले व तेथे तीनतीनशे वर्षे लूट केली. प्रथम व्यापार नंतर राजकारण व नंतर औद्योगिक क्रांती असा जो क्रम आहे, तो समजून घेतला तरच हे चक्र पुन्हा कसे उलटे फिरवायचे यावर विचार करता येईल. ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईतून नेलेली लूट ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीसाठी वापरली. त्याचा एक मोठा परिणाम असा होता की, ब्रिटनमध्ये पॉवर लूम आले व त्यामुळे भारतातील एक कोटी विणकरांचा रोजगार गेला. त्यांना परत शेतकरी व शेतमजूर व्हावे लागले. प्रत्येक व्यवसायात अशी स्थिती आली व शेतीतही अशीच स्थिती आलीे. आता माहितीतंत्रज्ञानामुळे काही जागतिक पातळीवर काही रोजगार भारताकडे येताना दिसतो आहे, पण त्याला मर्यादा आहे. आपल्या तरुणांनी ‘विश्व’ ही कल्पना समोर ठेवून कामाला आरंभ केला तर इतिहासाचे क्रम पुन्हा बदलण्याचे सामर्थ्य त्यात आहेे.

गप्पाष्टककार संजय उपाध्ये म्हणाले, जगात जेथे जेथे दुष्टता आहे तेथे तेथे जावून संवाद स्थापन करून तेथील दुष्टता नाहीशी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवर्षी नारद होय. या देशातील लोकजीवन, संगीत, योगाभ्यास, मुत्सद्देगिरी यासाठी देवर्षी नारद यांचे नाव घेतले जाते. भक्तीच्या क्षेत्रात नारद हे आदर्श मानले जातात. नारदांच्या निरनिराळ्या शिष्टाईतील हेतू हा जसा समाजातील दोषांना दूर करणे असा असे तोच हेतू प्रत्रकारितेचा असला पाहिजे. डॉ शाम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.