
मुंबई – मान्सूनपूर्व म्हणजेच वळिवाच्या यंदाच्या पहिल्या सरींनी मुंबई आणि ठाणेकरांना रविवारी संध्याकाळी भिजवले. रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा करीत असलेले मुंबईकर सुखावले आहेत.

मुंबई – मान्सूनपूर्व म्हणजेच वळिवाच्या यंदाच्या पहिल्या सरींनी मुंबई आणि ठाणेकरांना रविवारी संध्याकाळी भिजवले. रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा करीत असलेले मुंबईकर सुखावले आहेत.
गेल्या काही दिवसापासून मुंबई-ठाणेकर कमालीचा उकाडा सहन करीत आहेत. तसाच उकाडा रविवारी दुपारीही होता. मात्र नंतर आभाळ दाटून आले आणि संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने ठाण्यात जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या उपनगरात संध्याकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास अनेक ठिकाणी त्यांचा जोर वाढला होता. डोंबिवली , अंबरनाथ , नवी मुंबईतही पावसात भिजण्याचा आनंद लहानथोरांनी घेतला. नाशिक , तसेच सांगली-सातारा परिसरातही रविवारी वळिवाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली.
गेल्या वर्षी अपु-या पडलेल्या पावसामुळे आलेले दुष्काळाचे सावट यावर्षी दूर होईल , या आशेने शेतकरी पावसाची वाट पाहत असताना मान्सूनची चाहूल देणाऱ्या या सरींनी सर्वत्र आनंद पसरवला. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावर अनुकूल हवामान आहे. ही परिस्थिती दोन ते तीन दिवस कायम राहिली तर मान्सून त्या काळात महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकेल ,’ अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी दिली.
दरम्यान केरळमध्ये शनिवारी पोहोचलेल्या पावसाने रविवारीही तेथेच मुक्काम केल्याची माहिती केंद्रीय वेधशाळेने नोंदवली आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून कर्नाटकच्या आतील भागात , तसेच आंध्र प्रदेशपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मात्र त्याचवेळी कर्नाटक , गोव्यासह कोकणात पावसाच्या सरी येण्याची दाट शक्यताही वर्तवली आहे.