रायपूर दि. ३१- काँग्रेस परिवर्तन यात्रेवर हल्ला चढवून २९ जणांना ठार करणार्या नक्षलवाद्यांनी फेसबुक या सोशल साईटकडेही आता आपले लक्ष वळविले असल्याचे आढळून आले आहे. नक्षल छत्तीसगड या नावाने या साईटवर एक प्रोफाईल बनविला गेला असून त्याद्वारे नक्षलवादाचा प्रचार करण्याचे काम केले जात आहे असे समजते. विशेष म्हणजे या प्रोफाईलवर मित्र म्हणून छत्तीसगढमधील अनेक नेत्यांसह २९३ जण सामील झाले आहेत तर कांही जण या प्रोफाईलला फॉलो करत आहेत असेही दिसून आले आहे.
या प्रोफाईलवर नक्षल्यांचे अनेक फोटो आहेत त्याचबरोबर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि अन्य कांही नेत्यांविरोधात टीकाही केली गेली आहे. तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रोफाईल याच वर्षाच्या जानेवारीत तयार केले गेले आहे. यात अमली पदार्थांच्या किमती आणि ते विकत मिळण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहनही केले गेले आहे.पोलिसांच्या मते ही साईट कदाचित मजा म्हणूनही तयार केलेली असू शकेल मात्र त्यात राजकीय नेत्यांवर टीका करण्यात येत असल्याने त्याची दखल घेणे आवश्यक ठरले आहे.