राज्यात कायमची गुटखा बंदी

मुंबई, दि.३० – व्यसनाधीनता ही एखाद्या परकीय शत्रूपेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी कायम करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदीच्या निर्णयामुळे राज्याचा तब्बल १०० कोटींचा कर बुडाला. मात्र, गुटख्याचा भयंकर परिणाम लक्षात घेत राज्य मंत्रिमंडळाने गुटखाबंदीचा एकमुखी निर्णय जाहीर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात विडी, सिगारेट आणि तंबाखूवरील कर साडेबारा टक्के करण्यात आला. मात्र, केवळ बंदी घालून ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वाना एकत्र यावे लागणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. गुटखा आणि तंबाखू यांविरोधात लोकचळवळ उभी राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे तंबाखूप्रेम सर्वश्रुत असून, अनेक राजकीय सभा-संमेलनात हे तंबाखूप्रेम राजकीय शाब्दिक कोट्यांचा विषय बनतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारी आर. आर. पाटील यांची यावरून खिल्ली उडवली. राजारामबापू पाटील प्रबोधिनी’ने सांगली तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल अजित पवार यांनी या संस्थेचे विशेष कौतुक केले. तंबाखूमुक्त अभियानासाठी सांगली जिल्ह्याची केलेली निवड अगदी योग्य आहे. तुम्ही हे काम करूनच दाखवा. तुम्ही म्हणाल, ते करायला मी तयार आहे, असे उद्गार अजित पवार यांनी काढले.