वंदे मातरम् भारतातील मुस्लिमांसाठी राष्ट्रगीत – दलवाई

मुंबई, दि.२८ – वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आहे. स्वातंत्र्य लढ्यात हा एक मंत्र होता. त्यामुळे भारतातील मुस्लिमांचा वंदे मातरम् ला विरोध नाही आणि असूही नये, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष म्हणून ते एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

मौलाना आझाद विचार मंचची वंदे मातरम् बद्दल भूमिका काय ? असा प्रश्नद पत्रकारांनी विचारला असता दलवाई यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली. मौलाना आझाद यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम् या मंत्राने तरुणांना प्रेरणा दिली. वंदे मातरम् ची दोन कडवी राष्ट्रगीतासाठी मान्य करण्यात आली आहेत. त्यामुळे वंदे मातरम् ला कुणी धर्माशी जोडू नये, असेही ते म्हणाले.

ओबीसी प्रमाणे मुस्लिमांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी करणारा ठराव मुस्लिम शिक्षण परिषदेत केला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.