कान्स महोत्सवात २६ लाख डॉलर्सच्या हिरे हाराची चोरी

पॅरिस दि.२५ – सध्या फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात चोरट्यांनी दुसर्‍या वेळेला हात की सफाई दाखविली असून २६ लाख डॉलर्स किमतीचा हिरे हार हातोहात लंपास केला आहे. हा हार तसेच अन्य काही हिर्‍याचे दागिने परिधान करून २० मॉडेल्सनी नुकताच हॉटेल डू कॅप इडन रॉकमध्ये रँपवॉक केला होता. या कार्यक्रमाला हॉलिवूडच्या अभिनेत्री शेरॉन स्टोन आणि पॅरिस हिल्टन याही उपस्थित होत्या.

कान्समध्ये सध्या सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त अनेक सराफ जवाहिरे आपले दागिने घेऊन उपस्थित आहेत. हे दागिने सेलिब्रिटींना भाडे तत्वावर वापरण्यासाठी दिले जातात असे समजते. या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी ८० बॉडीगार्ड , स्थानिक पोलिस, हॉटेलचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत मात्र तरीही चोर्या होतच आहेत असे सांगण्यात येत आहे. गेल्याच आडवड्यात स्विस ज्वेलर शोपार्ड यांचे १४ लाख डॉलर्स किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. त्या पाठोपाठच ही दुसरी घटना घडली आहे.

रँपवॉकवर मॉडेलने हा हार घातला होता. नंतर तो संबंधितांना परत केला गेला. मात्र रात्री उशीरा जेव्हा पुन्हा एकदा दागिन्यांची तपासणी करण्यात आलीतेव्हा हा हार गायब झाल्याचे उघड झाले. पोलिस तपास सुरू असला तरी अद्यापी कोणताही धागा पोलिसांना मिळालेला नाही असे समजते.