जेम्स कुक या ब्रिटीश नाविकाने ऑस्ट्रेलियाचा शोध ११७० साली लावला हा इतिहास जुना ठरून नवीन इतिहास लवकरच लिहिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामागे आहेत कांही तांब्याची नाणी. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनार्यावर वाळूत ही नाणी १९४४ सालीच ऑस्ट्रेलियन सैनिक मरे याला सापडली होती.
इंडियाना विद्यापीठातील संशोधक आणि अॅथ्रॉपॉलॉजीचे प्रोफेसर इयान मॅकेंटॉश हे ही नाणी ज्या ठिकाणी सापडली तेथेच उत्खनानाचा उपक्रम येत्या जुलैमध्ये हाती घेणार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही नाणी १ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे या नाण्याचा अभ्यास केल्यानंतर सिद्ध झाले आहे. याचाच अर्थ कुकच्या अगोदरच ऑस्ट्रेलियात अन्य देशातील व्यापारी उतरले असावेत. १९४४ मध्ये दुसर्याा जागतिक युद्दाच्या काळात मरे हा सैनिक या बेटावर रडार स्टेशन चालविण्यासाठी एकटाच राहिला होता. फावल्या वेळात तो मासेमारी करत असे. तेव्हा किनार्यािवर वाळू खोदताना त्याला ही नाणी सापडली होती.
या नाण्यांमुळे आता अनेक प्रश्न संशोधकांपुढे उभे राहिले आहेत. जेम्स कुक हा ऑस्ट्रेलियात येणारा पहिला खलाशी नसेल तर मग कोण या बेटांवर प्रथम आले होते? कुकपूर्वी कांही डचांनी ऑस्ट्रेलियाच्या किनार्यावर पाऊल ठेवल्याचे आता सिद्ध झाले असले तरी ही नाणी आहेत आफ्रिकेतील किल्वा सल्तनीतील. ९०० ते १३०० या दरम्यान आफ्रिकेतील ही किल्वा सल्तनत व्यापारात अतिशय भरभराट पावलेली होती आणि त्यांचे भारताबरोबर व्यापारी संबंध होते असे मॅकेंटॉश यांचे म्हणणे आहे.
त्या काळी ही जमात सोने चांदी, मोती, पर्शियन सिरॅमिकस तसेच चीनी पोर्सलिनच्या वस्तूंचा व्यापार करत असे. या प्रकारची नाणी आफ्रिकेबाहेर आत्तापर्यंत केवळ दोनच वेळा मिळाली असून ती ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा आणि ओमान या देशांतच मिळाली आहेत असेही समजते.