बीजिंग, दि. २१ – भारतीय नेत्यांबरोबर झालेल्या पंतप्रधान ली यांच्या चर्चेला येथील प्रसारमाध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. भारताचा जपान किंवा फिलीपाईन्स होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी चीनने भारताच्या राष्ट्रीय संवेदनांचा सन्मान केला पाहिजे, अशी सूचना चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या राज्यकर्त्यांना केली आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग सध्या भारताच्या दौरयावर आहेत त्या पार्श्वेभूमीवर माध्यमांनी भारताशी चांगले संबंध राखणे चीनच्या कसे हिताचे आहे, यावर भाष्य केले आहे.
भारतासंबंधी चिनी राज्यकर्त्यांना चीनी माध्यमांच्या कानपिचक्या
यात माध्यमांनी म्हटले आहे की, भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय संबंधात अनेक कच्चे दुवे आहेत त्याचा गैरवापर त्रयस्थ देशांकडून होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही देशांनी आपसात विश्वाासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा छोट्या बाबींतूनही मोठा संघर्ष उद्भवू शकतो. आधीच चीनच्या शेजारी असलेल्या जपान आणि फिलीपाईन्समुळे चीनला मोठे आव्हान निर्माण झाले असताना भारताशीही संबंध बिघडवणे चीनला परवडणारे नाही त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय संवेदनांचा सन्मान करायला हवा, असे त्यांनी सुचवले आहे.
चीनचे लोक भारताला समजून घेण्यात किंवा त्यांचा सन्मान करण्यात कमी पडतात, असेही काही वृत्तपत्रांनी नमूद केले आहे. आपसातील संबंध चांगले ठेवणे ही दोन्ही राष्ट्रांची गरज आहे. याबाबत माध्यमांकडून रंगवल्या जाणार्या चित्रापेक्षा चीन सरकारनेही लोकांचे याबाबत मन वळवून त्यांच्या मनात विधायक प्रतिमा निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
