ढासळत्या अर्थव्यवस्थेला ‘औद्योगिक’ आधार

नवी दिल्ली, दि.२१ – गेले वर्षभर मंदी आणि महागाईचा तडाखा बसलेल्या औद्योगिक क्षेत्राने शेवटच्या महिन्यात मात्र ढासळत्या अर्थव्यवस्थेला ‘आधार’ दिला आहे. औद्योगिक उत्पादनात मार्चमध्ये गेल्या पाच महिन्यांमधील उच्चांकी २.५ टक्के वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात विकासाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. यावर्षी विकासदर सहा टक्के राहण्याची आशा त्यामुळे बळावली आहे.

औद्योगिक उत्पादनात सलग तिसरया महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे. याआधी डिंसेंबरमध्ये हे उत्पादन ०.५ टक्कयांनी घसरले होते, असे औद्योगिक उत्पादन निर्देशकांच्या आकडेवारीवरुन उघड झाले आहे. दरम्यान, या उत्पादनात गेल्या वर्षी मार्चमध्ये ३.६ टक्कयांची घट झाली होती.

मार्चमध्ये औद्योगिक क्षेत्राने झेप घेतली असली तरी या क्षेत्राची वर्षभरातील कामगिरी मात्र निराशाजनक राहिली आहे. २०१२-१३ या वर्षामध्ये या क्षेत्राच्या विकासदरात २.९ टक्कयावरून घट होत तो एक टक्कयांवर पोचला. तर २०११-१२ या वर्षामध्ये उत्पादनात २.८ टक्के इतकी घट झाली होती. उत्पादन क्षेत्रातील एकूण २२ उद्योगांपैकी १० उद्योगांनी सकारात्मक कामगिरी नोदंविली आहे. ऊर्जा, भांडवली वस्तू यांच्या उत्पादनात अनुक्रमे ३.५ टक्के आणि ६.९ टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, मार्चमध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असली तरी या क्षेत्रातील मंदीचा धोका अजून टळलेला नाही. विकासाची चक्रे गतिमान करण्यासाठी गुंतवणूकीत वाढ तसेच तात्काळ व्याज दर कमी करण्यासारखे उपाय योजण्याची गरज औद्योगिक संघटनांनी व्यक्त केली आहे.