पाकिस्तान निवडणुकीत फक्त ६ महिला विजयी

इस्लामाबाद, दि.१८ – पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत यावेळी केवळ ६ महिला उमेदवार विजय मिळवू शकल्या. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा विजय मिळवणार्याव महिला उमेदवारांची संख्या दोन-तृतीयांशने घटली आहे.मागील वेळी १८ महिला उमेदवार नॅशनल असेंब्लीवर जनतेतून निवडून गेल्या होत्या.

या निवडणुकीत १५० महिला उमेदवारांनी नशीब आजमावले. मात्र, केवळ ६ महिला उमेदवारच विजय मिळवू शकल्या. विजय मिळवणार्‍या महिला उमेदवारांमध्ये प्रत्येकी तिघी पीएमएल-एन आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. या सर्व महिला उमेदवार यापूर्वीही नॅशनल असेंब्लीवर निवडून गेल्या होत्या. त्यातील फहमिदा मिर्झा या मावळत्या नॅशनल असेंब्लीच्या सभापती आहेत, तर दोघी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या भगिनी आहेत.

दरम्यान, सहा महिला उमेदवारच थेट निवडून गेल्या असल्या तरी आणखी ६० महिलांना नॅशनल असेंब्लीच्या खासदार होण्याची संधी आहे. नॅशनल असेंब्लीतील ६० जागा महिलांसाठी तर १० जागा मुस्लिमेतर सदस्यांसाठी राखीव आहेत. निवडणुकीतील कामगिरीच्या प्रमाणानुसार प्रत्येक पक्षाला या राखीव जागांवर हक्क सांगता येऊ शकणार आहे.