जोहान्सबर्ग दि.१६ – दक्षिण आफ्रिकेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या घटस्फोटित पत्नी विनी मंडेला यांच्या खासगी वस्तूंचा लिलाव येत्या मंगळवारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. हा लिलाव त्या एका शाळेचे असलेले देणे भागविण्यासाठी केला जाणार आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार विनी यांचा नातेवाईक ज्या शाळेत शिकत होता त्या अॅबोट्स स्कूलची कांही थकबाकी मंडेला यांच्या नावावर होती. त्या संदर्भात न्यायालयात खटलाही सुरू होता मात्र गतवर्षी न्यायालयाने मंडेला यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे शाळेचे देणे आता विनी यांच्या वस्तू लिलावात काढून फेडले जाणार असल्याचे लॉ फर्म तर्फे सांगण्यात आले आहे.
हा लिलाव विनी यांच्या सोवेरो शहरातील घरातच केला जाणार आहे. त्यात त्यांच्या मालकीची डझनावारी पेंटींग्ज, चांदीचा टी सेट आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. विनी यांना शाळेचे २१५० अमेरिकी डॉलर्सचे देणे द्यायचे आहे.
विनी गेली कांही वर्षे सतत आरोपांच्या घेर्यारत अडकत गेल्या आहेत. गेल्याच वर्षी त्यांच्या घरात २४ वर्षांपूर्वी राहणार्यात दोन तरूण कार्यकर्त्यांचे सांगाडे फॉरेन्सिक तज्ञांनी शोधून काढले आहेत मात्र त्याबाबत अद्यापी कोणतेही आरोपपत्र सादर केले गेलेले नाही असेही समजते.