नवी दिल्ली, दि. 15 – विवाहित महिलांचा सासरी होणारा छळ आणि त्यांना जाळण्याच्या घटना देशात घडत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच सुनेला मोलकरणीसारखे नव्हे तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले जावे, असे नमूद केले. सुनेला केव्हाही सासरच्या घरातून बाहेर काढता येऊ शकणार नाही, असे न्यायालयाने यावेळी सुनावले.
पत्नीचा छळ केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरनैबसिंग याला पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. दोषीच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. दोषीला शिक्षा ठोठावताना न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. सासरच्या घरी विवाहितेला आदराची वागणूकच दिली जायला हवी. त्यातून सुसंस्कृत समाजाच्या संवेदनशीलतेचेच प्रतिबिंब उमटत असते. सुनेला अपरिचितासारखे वागवले जाऊ नये. तिला आपुलकीने आणि प्रेमळपणानेच वागवले जावे. सुनेला सासरी आदराची वागणूक मिळाल्याने विवाहाचे पावित्र्यच अधोरेखित होते, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
मात्र, अनेक घरांमध्ये सुनेला असंवेदनशीलतेने वागवले जाते. हुंड्यासाठी क्रूरपणे सुनेचा छळ केला जातो. तिला जाळण्याच्याही घटना घडतात ही अतिशय चिंतेची आणि लज्जास्पद बाब आहे. विवाहितेला असंवेदनशीलतेने वागवण्यात आल्यामुळे तिची जगण्याची इच्छाच उद्ध्वस्त होते, असेही न्यायालयाने म्हटले.