पंचिंग बॅगने वाढविली प्रियंकाची डोकेदुखी

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा खरेतर आपली प्रत्येक भूमिका जीव ओतूनच साकारते, पण आगामी चित्रपटातील एका भूमिकेबाबत सध्या ती जरा जास्तच गंभीर झाल्याचे दिसत आहे. या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घेण्याची तयारी ती दाखवत आहे. भले मग त्यामुळे काही लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागत असली तरी तिला त्याची फिकीर नाही. ही सगळी मेहनत ज्या भूमिकेवर ती घेत आहे, त्यामध्ये ती भारताची ऑलिम्पिक विजेती बॉक्सर मेरी कॉमला रूपेरी पडद्यावर साकारणार आहे.

मेरी कॉमचे पात्र साकारण्यासाठी प्रियंकाने जोरदार तयारी सुरू केली अहे. साहजिकच सगळ्य़ात आधी तिची सुरू बॉक्सिंग बॅगपासून झाली आहे. पंच मारण्याचा सराव करण्यासाठी आता तिने
आपल्या घरीच बॉक्सिंग बॅग बसविण्याची योजना आखली आहे. मात्र यामध्ये ती स्वत:च सगळ्य़ात मोठा अडथळा ठरली होती. बॉक्सिंग पंचमुळे आपल्या घराच्या छतामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल व्हावा अशी तिची इच्छा नव्हती. तसेच घरात कुणी आल्यानंतर त्यांना आपले बॉक्सिंग बॅगसमोरच दर्शन व्हावे वा घरामध्ये हिंडताफिरताना त्यामुळे अडथळा यावा, असेही तिला वाटत नव्हते.

बॉक्सिंग बॅग घरामध्ये नेमकी कुठे बसवावी ही गेले काही दिवस प्रियंकासमोरची मोठी डोकेदुखी बनली होती. प्रियंका वर्सोवातील ज्या इमारतीमध्ये राहते, तिथेच शहिद कपूर आणि त्याचा पिता पंकज कपूरही राहतात. शांतताप्रिय प्रियंकाने मागे एकदा इमारतीतील मुलांच्या सततच्या
गोंगाटामुळे नोटीसही बजावली होती. त्यामुळे बॉक्सिंग बॅग अन्यत्र कुठे लावण्याचीही सोय नव्हती. त्यानंतर आपल्या पित्याच्या सूचनेनंतर तिने इमारतीच्या चेअरमनशी चर्चा केल्यावर तिला एक सार्वजनिक वापराची जागा उपलब्ध करून देण्यात आली. तेव्हा कुठेही या समस्येतून तिची सुटका झाली. संजय लीलाची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे उमंग कुमारे दिग्दर्शन करीत
असून या भूमिकेबाबत प्रियंका प्रचंड उत्साहित आहे.