पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीयांपेक्षा जास्त आनंदी आणि सुखी…


नवी दिल्ली – कोरोना महामारीचं संकट असतानाही फिनलँड हा सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. शुक्रवारी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आली. या यादीनुसार फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात सुखी व आनंदी देश ठरला आहे.

१४९ देशांचा समावेश संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. भारताला १४९ देशांच्या यादीत १३९ क्रमांक मिळाला आहे. देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न ही यादी जाहीर करताना विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.

या यादीत चीन ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहे. फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. तर, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या यादीत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळालेले नाही. अमेरिकेचा जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये १९ वा क्रमांक आहे.