बिजिग दि. १४- भारताची अंतर्गत व्यवस्था गोंधळाची आहे. तेथील स्थानिक प्रश्नांना बगल देऊन नागरिकांचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी तसेच निवडणुकांत मते मिळविण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांकडून आधुनिक शस्त्रे हस्तगत व्हावीत यासाठी भारत चीनवर अतिक्रमणे केल्याचे आरोप सतत करत आहे असा आरोप तेथील वृत्तपत्राने केला आहे. विशेष म्हणजे हे वृत्तपत्र सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र समजले जाते.
मते मिळविण्यासाठी भारतीय राजकारण्यांचे चीनवर आरोप
लडाख भागात चीनी सैनिकांनी तंबू ठोकून भारतीय हद्दीत अतिक्रमण केल्याचा मुद्दा गाजत असताना आणि चीनी पंतप्रधानांची भारत भेट जवळ आली असताना हे आरोप करण्यात आले आहेत. त्यात असे म्हटले गेले आहे की भारतीय राजकारण्यांकडून सातत्याने सो कोल्ड चायना थ्रेटचे भांडवल केले जात आहे. चीनबाबत सतत कांही ना कांही तक्रारी केल्या जात आहेत. मात्र त्यात कांहीही तथ्य नसून हा कांगावा अंतर्गत प्रश्नांवरून देशवासियांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आणि निवडणुकात मते मिळविण्यासाठीच आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर असा कांगावा करून पाश्चिमात्य देशांची सहानुभूती आपल्या बाजूला वळविण्याचा आणि त्यातून आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न भारताकडून होत आहे. भारत चीन सीमा प्रश्न, चीन पाकिस्तान संबंध, दलाई लामा इश्यू असे अनेक प्रश्न महत्त्वाचे असताना त्याबाबत कांहीच न बोलता चीनवर सतत आरोप हा एकच मार्ग भारत अवलंबित असल्याचेही या वृत्तात नमूद केले गेले आहे.
