सिद्धरामय्यांकडून गरिबांसाठी ४ हजार कोटींचा बोनान्झा

बंगळूर, दि. १४ -कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सिद्धरामय्या यांनी गरिबांसाठी तब्बल ४ हजार ४०९ कोटी रुपयांचा बोनान्झा जाहीर केला. त्याचा लाभ गरिबांसह अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि अल्पसंख्याकांनाही होणार आहे.

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. अर्थात, मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची नावे अजून निश्चिझत झाली नसल्याने ही बैठक त्यांच्या एकट्याच्याच उपस्थितीत झाली. या बैठकीत त्यांनी गरीब आणि इतर घटकांना खूश करणार्या  अनेक घोषणा केल्या. त्यानुसार गरिबांना जूनपासून दरमहा ३० किलो तांदूळ १ रुपया दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ कर्नाटकमधील दारिद्रद्यरेषेखालील ९८.१७ लाख लोकांना होणार आहे. स्वस्तात तांदूळ उपलब्ध केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अनुदानात वाढ, घरबांधण्यासाठी गरिबांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ, सरकारी महामंडळांकडून एससी/एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांनी घेतलेल्या कर्जांची माफी आदी निर्णयही यावेळी घेण्यात आले. या निर्णयांच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेल्या आश्वायसनांच्या पूर्ततेसाठी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.