पाकिस्तानात लोकशाही

पाकिस्तानात सलग दोन वेळा निवडणुका होऊन लोकशाहीवादी सरकार सत्तेवर आले आहे. या देशाला आपण वाचवू शकतो असा दावा करून माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ हे विजनवासातून पाकिस्तानात आले होते आणि त्यांनी पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगली होती. त्यामुळे निवडणुका घोाषित झाल्या तेव्हा ही निवडणूक चौरंग होणार असे वाटत होते. प्रत्यक्षात मुशर्रफ यांचा पत्ता कट झाला आणि निवडणूक तिरंगी झाली. या देशाच्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत मावळते सत्ताधारी नेते आसिफअली झरदारी, पाकिस्तानी मुस्लिम लीगचे नेते नवाज शरीफ आणि पाकिस्तानी तहरिके इन्साफ या तिघांमध्ये सामना होता. पाकिस्तानी पीपल्स पार्टी हा पक्ष मुळात 2008 सालीच सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आला होता आणि त्यामुळे त्याला सत्ता मिळाली होती. ती सत्ता त्यांनी फार जबाबदारीने सांभाळली नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ होता. परंतु सार्‍या जगाने इम‘ान खानला उचलून धरले होते. त्याच्या सभांना भरपूर गर्दी होत असे आणि राज ठाकरे स्टाईलने ते नवाज शरीफ यांच्यावर व्यक्तीगत टीका करत असत. झरदारी यांना जनतेने भ‘ष्टाचारामुळे नाकारलेच परंतु याच पाकिस्तानी जनतेने इम‘ान खान यालासुध्दा फार मोठी संधी दिली नाही.

ज्यांच्या सभांना गर्दी होते ते लोक निवडून येतातच असे नाही. याचा प्रत्यय इम‘ान खानच्या सभा आणि त्याला मिळालेल्या 35 जागा यावरून येतो. इम‘ान खानची नवाज शरीफ यांच्यावरची तिखट चर्चा ही लोकांना आवडत असे परंतु तिला उत्तर देताना नवाज शरीफ यांनी कधीही इम‘ान खानवर वैयक्तिक प्रति टीका केली नाही. आपण कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही आणि जे आपल्यावर अशी टीका करतात त्यांना तसे उत्तरसुध्दा देत नाही. असे शरीफ यांनी वारंवार सांगितले. त्यांनी आपल्याच पंतप्रधान कारकिर्दीमध्ये पाकिस्तानने अणुस्फोट केलेले आहेत याची आठवण देशाला करून दिली आणि आपण सत्तेवर आल्यास देशाला जगाने दखल घ्यावी अशी आर्थिक शक्ती करू असे आश्‍वासन दिले. त्यांचा हा निर्धार आणि यापूर्वी त्यांना दोनवेळा आलेला पंतप्रधानपदाचा अनुभव याचा विचार करून पाकिस्तानी जनतेने त्यांना भरभरून मतदान केले. केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तानातल्या लोकांनासुध्दा विकास आणि मजबूत अर्थव्यवस्था या गोष्टी महत्त्वाच्या वाटायला लागल्या आहेत आणि केवळ वैयक्तिक टीका करून तसेच जातीयवादी धार्मिक भावना भडकावून सत्ता मिळवू पाहणार्‍यांना जगातल्या कोणत्याच भागातले लोक आता निवडून देईनासे झाले आहेत. मध्यममार्गी नेतेच लोकशाहीमध्ये तरी सत्ता मिळवू लागले आहेत. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तानमधल्या विजयाचा अर्थ ध्यानात घेतला पाहिजे. तिथे आता मुस्लिम लीगचे सरकार सत्तेवर येणार हे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत 264 जागांसाठी मतदान झाले. त्यातील 125 जागा नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीगला मिळाल्या आहेत. स्पष्ट बहुमतासाठी 137 जागांची गरज आहे. नवाज शरीफ यांच्या पक्षाला काठावरचे का होईना बहुमत मिळाले आहे. त्यांचे त्रिशंकू सरकार सत्तेवर येणार आहे. परंतु त्यांना बहुमतासाठी फार मोठी जमवाजमव करण्याची गरज नाही. त्यामुळे सरकार त्रिशंकू असले तरी फार मोठी अस्थिरता निर्माण होणार नाही. पाकिस्तानी पीपल्स पार्टीला केवळ 35 जागा मिळाल्या आहेत. हा पक्ष सत्तेवरून गेलेला आहे. मुळात गेल्या निवडणुकीतच त्यांना सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती. नवाज शरीफ हेही परागंदा झालेे होते. म्हणजे समोर तगडा प्रतिस्पर्धी कोणी नव्हता त्याचा फायदा मिळून पाकिस्तान पीपल्स पार्टीला सर्वात मोठा पक्ष होण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तीन पक्षांशी युती करून सत्ता प्राप्त केली होती. यावेळी मात्र अशा अनुकूल गोष्टी उपलब्ध नव्हत्या. सहानुभूतीची लाट नव्हती आणि नवाज शरीफ समोर उभे होते. देशाचा कारभार गांभिर्याने हाकू शकणारे नेते म्हणून नवाज शरीफ यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी ते दोन वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी पीपल्स पार्टीपेक्षा नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीगकडे सत्तेची सूत्रे सोपवावीत असा विचार पाकिस्तानी जनतेने केला. येत्या काही वर्षात तरी पाकिस्तानचे भवितव्य ठरविण्याची जबाबदारी यांच्यावर आहे.

पाकिस्तानच्या राजकारणामध्ये लष्कराचे वर्चस्व नेहमीच जाणवते. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासुनच्या 65 वर्षात देशातल्या कोणत्याही लोकनियुक्त सरकारला आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करता आलेली नाही. एखादे सरकार चांगले टिकले की मध्येच काहीतरी निमित्त करून लष्कराने सत्ता काबिज केलेली आहे. परंतु या इतिहासामध्ये असे प्रथमच घडत आहे की एक लोकनियुक्त सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे आणि त्याच्याच नेतृत्वाखाली दुसरी निवडणूक होऊन लोकनियुक्त सरकार सत्तेवर येत आहे. पाकिस्तानमध्ये सर्वसाधारण जनतेला लोकशाही हवी आहे. त्यामुळे संधी मिळताच त्या देशातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. 2008 साली केवळ 44 टक्के मतदान झाले होते. परंतु यावर्षी ते 60 टक्क्यांपेक्षाही अधिक झालेे आहे. पाकिस्तानातल्या लोकांना भारताशी चांगले संबंध ठेवले जावेत असे वाटते. काही ठराविक कट्टरतावादी लोक सोडले तर बाकीच्या सर्व लोकांना पाकिस्तानचा विकास आणि प्रगती भारताच्या प्रगतीच्या पॅटर्ननुसार व्हावी असे वाटत असते आणि नवाज शरीफ यांनी आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये आपण भारताशी चांगले संबंध ठेवू असे वारंवार म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेने त्यांना कौल दिला आहे.