शिवसेना हा रालो आघाडीतला भाजपाचा मित्र पक्ष आहे. या दोन पक्षांमध्ये कधी कधी कुरबुरी होतात. कधी कधी तर हे दोन पक्ष वेगळे होणार अशाही चर्चा होत राहतात. पण लोकशाहीमध्ये दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले की अशा प्रकारच्या कुरबुरी अपरिहार्य असतात. मात्र आता शिवसेनेने भाजपाच्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यातून या दोन पक्षातला मतभेद उजागर होत आहे. परंतु शिवसेनेने उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि शिवसेनेला तो हक्क आहे. कारण भाजपा आणि शिवसेना यांची युती हिंदुत्ववादाच्या आधारावर झालेली आहे. भाजपाचा हिंदुत्ववाद पातळ व्हायला लागला तर शिवसेना भाजपाला प्रश्न विचारू शकते. तसा तो आता विचारला गेला आहे. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न समोर आला आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला परंतु अगदी हिंदुत्ववादी बालेकिल्ल्यातसुध्दा भाजपाला पराभव सहन करावा लागला असे का झाले? लोक नरेंद्र मोदी यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून बघतात. परंतु कर्नाटकात प्रचार करताना मोदी हिंदुत्ववादावर बोललेच नाहीत. ही गोष्ट शिवसेनेला खटकली आहे. दैनिक सामनाच्या लेखामधून शिवसेनेने मोठा भेदक प्रश्न उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत उतरून काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. बंगलोर शहर आणि मंगळूर, उडुपी हा परंपरेने हिंदुत्ववादी असलेला पट्टा त्यांनी जाहीर सभांनी पिंजून काढला. पण बंगलोर शहर वगळता अन्य भागात भाजपाचा अक्षरशः सफाया झाला.
शिवसेनेचा सवाल
नरेंद्र मोदी यांच्यासारखा कट्टर हिंदुत्ववादी नेता मंगळूरसार‘या हिंदुत्ववादी बालेकिल्यात सभा घेतो, त्याच्या सभांना लोकांची प्रचंड गर्दीही होते परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत पक्षाचा फज्जा उडतो असे का होेते. असा प्रश्न भारती जनता पार्टीच्या वरिष्ठ स्तरावरसुध्दा चर्चिला जात आहे. कारण मोदी हे भारतातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. असा भाजपाच्या नेत्यांचा दावा आहे परंतु त्यांनी सभा घेऊनसुध्दा भाजपाच्या बालेकिल्ल्यातच भाजपाचा पराभव झाला आहे. मग मोदींचा करिश्मा खरा की खोटा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकातल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. त्या बैठकीला नरेंद्र मोदी बोर्डाचे सदस्य असूनसुध्दा हजर राहिले नाहीत. दातावर उपचार सुरू असल्याचे कारण सांगून त्यांनी या बैठकीला हजर राहणे टाळले. अर्थात, ते बैठकीला आले नसले तरी मंगळूर परिसरातल्या पक्षाच्या पराभवाची चर्चा झाल्याशिवाय राहिली नाही. ती भारतीय जनता पार्टीत जशी होणार आहे तशीच ती भाजपा प्रणित रालो आघाडीच्या घटक पक्षातसुध्दा होणार आहे आणि शिवसेनेने या चर्चेला एक वेगळा मुद्दा हाताशी घेऊन तोंड फोडले आहे.
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोदी हे लोकप्रिय वाटतात. कारण ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यामुळेच संघ परिवार त्यांना पुढे करत आहे. म्हणजे संघाने त्यांचा पुरस्कार करण्यामागे हिंदुत्ववाद हेच त्यांचे भांडवल आहे. परंतु नरेंद्र मोदी वेगळाच विचार करत आहेत. आपल्याला पंतप्रधानपद प्राप्त करायचे असेल तर हिंदुत्ववादी ही आपली प्रतिमा उपयोगास येणार नाही. उलट आपण विकासपुरुष म्हणून जेवढी आपली प्रतिमा चांगली उभी करू तेवढे पंतप्रधानपद आपल्या आवाक्यात येईल. हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे संघाने त्यांना हिंदुत्ववादी म्हणून पुढे केले असले तरी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी झालेल्या सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी कोठेही हिंदुत्ववाद मांडलेला नाही. त्यांनी कधी काँग‘ेसवर मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष म्हणून टीका केलेली नाही. त्यांनी मुस्लिम जातीयवाद्यांच्या विरुध्द ब‘ही उच्चारला नाही. ते सातत्याने विकासाचीच चर्चा करत आहेत. त्यांना संघाने पुढे केले आहे तो अजेंडा हिंदुत्ववादी आहे. परंतु मोदी तो अजेंडा सोडून देत आहेत. सत्तेवर येण्यासाठी तो उपयोगाचा नाही असे त्यांना वाटत आहे. म्हणजे संघाच्या प्रशस्तीसाठी हिंदुत्ववाद लोकांच्या पाठिंब्यासाठी विकासवाद. अशी मोदी यांची दुहेरी नीती आहे.
शिवसेनेला या संबंधात काही प्रश्न पडलेले आहेत आणि ते साहजिक आहेत. बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांनीसुध्दा असेच म्हटले असते. तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्ववादच मांडा, उगाच सेक्युलर असल्याचे ढोंग करू नका. असा परखड सल्ला बाळासाहेबांनी दिला असता. परंतु केवळ मोदीच नव्हे तर भाजपाचे सगळेच नेते वेळ पडेल तसा हिंदुत्ववाद मोडून खात असतात. ज्या काळात त्यांना राम मंदिराच्या लाटेवर निवडून येऊ असे वाटत होते त्या काळात त्यांनी राम मंदिराचा वापर केला मात्र लोकांना राम मंदिराबाबत आता तेवढी आस्था राहिलेली नाही असे लक्षात यायला लागले तसे त्यांनी रामाला वनवासात पाठवून दिले आणि विकासावर भर द्यायला सुरूवात केली. शिवसेनेचा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी हिंदूंचा पक्ष आहे की नाही? निवडून येण्याची शक्यता कमी दिसायला लागताच भाजपाचे नेते हिंदुत्ववादाला सोडचिठ्ठी देत असतील तर मग या देशामध्ये हिंदूंचा पक्ष कोणता? शिवसेनेच्या प्रश्नामुळे भाजपाचे नेते अस्वस्थ झाले असतील परंतु प्रश्न बिनतोड आहे.
