पत्नीसाठी काहीही!

कुत्रा माणसाला चावला ही बातमी होऊ शकत नाही. मात्र माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते असे म्हणतात. म्हणून ही बातमी वाचा. पत्नीवर हल्ला करणार्‍या कुत्र्याचा पतीने चावा घेऊन त्याचे लचके तोडल्याची घटना रविवारी आयोवा राज्यात घडली आहे.

ग्रिम्स (आयोवा) येथे राहणार्याो कॅरेन हेन्री या आपल्या कुत्र्याला बरोबर घेऊन दिराच्या घरी चालल्या होत्या. काही अंतर चालत गेल्यानंतर एक मोठे कुत्रे त्यांच्या दिशेने जोरात पळत आले. कुत्र्याने थेट कॅरेनवरच हल्ला चढवून खाली पाडले. कॅरनेच्या डोळ्यांवर गॉगल असल्यामुळे कुत्र्याच्या नख्यांपासून डोळे बचावले. मात्र, चावा व नख्यांमुळे शरीरावर जखमा झाल्या. 

कॅरेन यांचे पती लेन हेन्री हे मोटारीमधून जात असताना कॅरनवर कुत्र्याने हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. लेन यांनी तत्काळ कुत्र्यावर झेप घेऊन, त्याचे लचके तोडण्यास सुरवात केली. या घटनेत कुत्र्याचे नाक तुटले असून, त्याला सुद्धा जखमा झाल्या आहेत. पत्नीच्या प्रेमापोटी मी धाडसीपणाने हे कृत्य केले आहे, असे लेन यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर हेन्री पती-पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.