गोपीचंद पडळकरांसह 9 जणांना पुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी अटक


पुणे : पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी राज्य सरकारने एमपीएससीची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते.

तब्बल आठ तास या आंदोलकांनी संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती.

पोलिसांनी याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली. हा गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.