कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज होणार निश्‍चित

बंगळूर, दि.9 -कर्नाटकची सत्ता हस्तगत करणार्‍या काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्‍चित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि सिद्धरामय्या या ज्येष्ठ नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 121 जागा पटकावून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. या राज्याची सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसच्या गोटात मुख्यमंत्री निवडीच्या हालचालींना आणि मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आता उद्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून संरक्षणमंत्री ए.के.अँटनी आणि इतर काही नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करायची याबाबत हे नेते नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून घेणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी सध्या तरी केंद्रीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि मावळत्या कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची नावे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या पदासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री एम.वीरप्पा मोईली यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.