संधीचे सोने करावे- श्रीकांत

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सूर हरविल्याने वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि गौतम गंभीर या खेळाडूंना टीम इंडियातून स्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडमध्ये होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात या तिघांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात निराश न होता या तिघा जणांनी देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरीत सुधारना करून मिळालेल्या संधीचे सोने करावे, असा सल्ला राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनी दिला.

यावेळी बोलताना श्रीकांत म्हणाले, ‘ तसे पहिले तर सेहवाग, गंभीर आणि युवराज हे खेळाडू अजून तरुण आहेत. त्यांना पुनरागमन करण्याची संधी आहे. ते जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढत राहिले तर त्यांना संघातील जागा परत मिळवण्याची संधी आहे. पुढील हंगामात त्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करावी आणि राष्ट्रीय संघातील स्थान परत मिळवावे.’

आगामी काळात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड हे तीन संघ विजेतेपदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या पैकीच एक संघ बाजी मारेल असे वाटते असेही श्रीकांत यांनी यावेळी बोलताना सांगितले .