पोपटाला मुक्त करा

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गुप्तचर यंत्रणात काम करणार्‍या अधिकार्‍यांना निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कामाविषयी विचारले तर ते फार कटुतेने बोलतात. केंद्राच्या अशाच इंटेलिजन्स ब्यूरो या यंत्रणेच्या प्रमुखांनी सेवा निवृत्त झाल्यानंतर या यंत्रणेतल्या आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले होते. इंदिरा गांधी यांनी या यंत्रणेचा वापर देशासाठी हेरगिरी करण्याकरिता, करण्याऐवजी आपल्या राजकीय विरोधकांवर नजर ठेवण्यासाठीच कसा केला याची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली होती. इंदिरा गांधी आपल्याला आव्हान देणार्‍या विरोधकांची फाईल तयार करत असत आणि त्यासाठी या यंत्रणेचा वापर करत असत. अशाच यंत्रणेमध्ये सीबीआयचा समावेश होतो. सध्याचे सत्ताधारी नेते सीबीआयचा वापर असाच करत आहेत आणि ही गोष्ट आता सर्वोच्च न्यायालयात उघड झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय ही यंत्रणा म्हणजे पिंजर्‍यातला पोपट आहे आणि त्याला अनेक मालक आहेत असे परखड उद्गार काल काढले. न्यायालयाच्या या एका उद्गारामध्ये काँग‘ेसच्या आजवरच्या राजवटीचे मर्मच उकलले जात होते.

कारण काँग‘ेसने आजपर्यंत सीबीआयचा वापर भ‘ष्टाचार निर्मूलनासाठी करणाऐवजी आपला भ‘ष्टाचार झाकण्यासाठीच केलेला आहे हे सत्य आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचे हे उद्गार प्रसिध्द होताच आजवर सीबीआयचे संचालक म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी उचलून धरली. न्यायालयाने जे काही म्हटले आहे ते पूर्ण सत्य आहे आणि आजपर्यंत सीबीआयचा वापर काँग‘ेसने आपल्या स्वार्थासाठीच केलेला आहे असे या प्रत्येकाने उघडपणे म्हटले आणि गोष्ट सरळ आहे. सीबीआय ही गुन्ह्यांची तपास करणारी यंत्रणा आहे. परंतु या यंत्रणेचा प्रमुख कोण असावा याचा निर्णय सरकार करते. ही यंत्रणा केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत असते. त्यामुळे तिच्या मालकाचा भ‘ष्टाचार उघड होतो. तेव्हा या यंत्रणेला म्हणाव्या तशा परखडपणाने तपासकाम करता येत नाही. कोणाचा तपास करावा, कोणाचा करू नये, कधी करावा, किती वेगाने करावा या सगळ्या सूचना गृहखाते सीबीआयला देते त्यामुळे आपल्या शत्रूंचा काटा काढण्यासाठी आणि आपला भ‘ष्टाचार लपवण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे. ते सारे सत्ताधारी पक्षाचे नेते सीबीआयकडून करवून घेतात. एकदा असे झाले की, रॉबर्ट वड्राच्या भ‘ष्टाचाराची चौकशी कधीच होत नाही आणि जगनमोहन रेड्डींने सोनिया गांधींना जुमानले नाही की त्याची चौकशी मात्र तातडीने सुरू होते. सीबीआयचा वापर नरसिंहराव यांनीसुध्दा सोनिया गांधींच्या विरोधात केला होता. 1991 ते 95 अशी पाच वर्षे रावांनी सोनिया गांधीचा राजकारण प्रवेश रोखून धरला होता. सोनिया गांधी काही गडबड करायला लागल्या की नरसिंहराव सीबीआयकडून बोफोर्स प्रकरणाचा एखादा दस्ताऐवज वृत्तपत्रांकडे पाठवून देत असत. त्यावर आरडाओरडा आणि चर्चा सुरू झाली की सोनिया गांधींना माघार घ्यावी लागत असे. असा हा सीबीआयचा पोपट आजपर्यंत राजकारण्यांच्या पिंजर्‍यात बंद आहे. त्यामुळे देशातला भ‘ष्टाचार मोकाट सुटला आहे. अण्णा हजारे यांच्यामते केंद्रातले निम्मे मंत्री भ‘ष्ट आहेत. खुद्द पंतप्रधान कोळसा खाण वाटपात दोषी असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांचा तपास करणारी सीबीआय यंत्रणा ही पूर्णपणे त्यांच्या ताटाखालचे मांजर बनल्यामुळे या भ‘ष्टाचाराची चौकशीच होत नाही. ए. राजा यांचा 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा 8 वर्षांपासून प्रकाशात आला होता. सीबीआयकडून त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा ही चौकशी आस्तेकदम केली जात आहे हे न्यायालयाच्या लक्षात आले तेव्हा न्यायालयाने ही चौकशी आपल्या निगराणी खाली होईल असे जाहीर केले. तेव्हा कुठे ए. राजांच्या हातात बेड्या पडल्या. न्यायालयाने या चौकशीवर नियंत्रण ठेवले नसते तर ए. राजा कधीच कारागृहात गेले नसते.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. त्यामुळे सीबीआय आणि केंद्र सरकार या दोन्हींच्या मध्ये कसलेच संबंध राहणार नाहीत अशा प्रकारचा कायदा केला जावा असे न्यायालयाने बजावले आहे. 10 जुलैपर्यंत या संबंधात योग्य ती पावले केंद्र सरकारने टाकावीत अन्यथा सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल असेही न्यायालयाने खडसावले आहे. याबाबत न्यायालय नेमके काय करणार आहे हे माहीत नाही. परंतु न्यायालयाला एक गोष्ट नक्कीच करता येईल की केंद्रातल्या मंत्र्याच्या भ‘ष्टाचाराची चौकशी सीबीआयकडून होत असेल तर ती चौकशी पूर्णपणे न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावी अशी सूचना देता येईल. तसे केल्यास कोलगेट प्रकरणाप्रमाणे सीबीआयच्या अहवालामध्ये ढवळाढवळ करण्याची संधी मंत्र्यांना मिळणार नाही. असे झाले तर केंद्र सरकारचे पितळ उघडे पडेल. जे 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणात उघडे पडले आहे. केंद्र सरकार मोठे स्वच्छ असल्याचा दावा करते परंतु या दाव्याचे खरे रहस्य सीबीआयमध्ये दडलेले आहे. कोण स्वच्छ आहे आणि कोण भ‘ष्ट आहे याची चौकशी करणारी ही यंत्रणा या भ‘ष्ट लोकांच्या ताब्यात आहे. म्हणून ते तिच्याकडून स्वतःला स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र मिळवितात.