भाजपच्या पराभवाची कारणमिमसा सुरु

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमिमसा आता भाजपने सुरु केली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांच्या पक्षाला या निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले, तरी भाजपचा विजय त्यांनी हिरावून नेला. काँग्रेसला निर्विविद यशाकडे नेण्यात त्यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मते १३.४ टक्क्यांनी घसरली. तर काँग्रेसच्या मतांमध्ये २.४६ टक्क्यांनी वाढ झाली. तर उर्वरित ११ टक्के मते येडियुरप्पांची कर्नाटक जनता पार्टी , अपक्ष उमेदवार आणि इतरांना मिळाली. यामुळे केवळ २.४६ टक्के वाढीव मतांच्या जोरावर काँग्रेसने ५० टक्के अधिक जागा पटकावल्या. उडुपी , मंगलोर , कारवार , शिमोगा , हुबळी , धारवाड , बेळगाव , हावेरी , दावणगिरी येथून भाजपचे अस्तित्व पुसले गेले.

गेल्या निवडणुकीत भाजपसाठी लिंगायत समाजात प्रभुत्व असलेला बेल्लरी ते शिमोगा हा पट्टा बालेकिल्ला ठरला होता. २००८च्या निवडणुकीत येथून तब्बल २५ जागा भाजपच्या पदरात पडल्या होत्या. या भागावर आधी रेड्डी बंधूंचे तर नंतर येडियुप्पाचे वर्चस्व होते. त्यामुळेच या निवडणुकीत भाजपच्या पदरात येथे केवळ चार जागा पडल्या आहेत. त्यासोबतच मुंबई-कर्नाटक भागात गेल्या वेळी ४४ जागा मिळवणा-या भाजपला यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळेच या निवडणुकीत येडियुरप्पा , जी. जनार्दन रेड्डी आणि शेट्टर हे तीन भाजपच्या पराभवाला आणि काँग्रेसच्या विजयाला कारणीभूत ठरले आहेत.