महाराष्ट्र ही ‘संताची भूमी’ म्हणून ओळखली जाते. भक्ती आणि परमार्थाची शिकवण या संतांनी आपल्या कार्यातून जनमानसात पोहचवली, त्यातूनच आपल्या संस्कृतीचा, अध्यात्माचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास यांसारख्या महात्म्यांचे आजही आपण स्मरण करतो. याच मांदियाळीतले एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘संत सखू’. स्त्री संतांच्या परंपरेतील हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. ‘संत सखू’च्या कार्याची थोरवी भजन किर्तनातून गायली जातेय, तिच्या भक्तीरसाची गाथा आता ‘अशी होती संत सखू’ या चित्रपटरूपाने आपल्यासमोर येतेय. ‘सिने टोला इंटा’ प्रस्तुत आणि जी.सी गुप्ता, सुभाष शर्मा निर्मित ‘अशी होती संत सखू’ 17 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष शर्मा यांनी केले असून संत सखूची मध्यवर्ती भूमिका निशा परुळेकर हीने साकारली आहे.
सर्वसामान्यांचा देव असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल व त्याच्या वारीविषयीची पराकोटीची ओढ भक्तगणांमध्ये असते. याच श्रध्देतून वारीसोबत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा मोह भक्तगणांना आवरत नाही. अशाच विठ्ठलाच्या भक्तीरसात तल्लीन झालेल्या संत सखूची कहाणी पडदयावर अवतरणार आहे. व्ठ्ठिलाच्या दर्शनाला आणि वारीच्या अनुपम सोहळयाला जाण्यासाठी आसुसलेल्या सख्tाला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते याची भावस्पर्शी कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल. संत सख्tाच्या भूमिकेतील निशा परूळेकर सोबत मिलिंद गवळी, वर्षा दांदळे, मिनल वेदविख्यात, सुधीर दळवी, सुलभा देशपांडे, अनिकेत केळकर, जागृती मेहता या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
‘अशी होती संत सखू’ चित्रपटाची पटकथा-संवाद अनिल कालेलकर यांनी लिहीले आहेत. प्रकाश राणे व विदयाधर जोशी यांच्या गीतांना नेहा राजपाल, त्यागराज खाडीलकर, अभिजीत पाटील यांनी आवाज दिला असून नितीन हिवरकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. छायांकन चंद्रशेखर रथ यांनी केलं आहे तर संकलन समीर शेख यांच आहे. कला दिग्दर्शन गौतम-ललित चिकसकर व नृत्यदिग्दर्शन सुभाष शर्मा, संग्राम भालकर यांनी केले आहे. अजय छारीया, रवी गुप्ता चित्रपटाचे सह निर्माते आहेत. या आधी ‘प्रभात’ची निर्मिती असलेला व राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेला ‘संत सखू’ हा चित्रपट 1941 साली चांगलाच गाजला होता. संत सखूची भूमिका करणाऱया अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या भूमिकेचेही भरपूर कौतुक झालं होतं. अवीट चालीची भक्तीपूर्ण गीते ही या चित्रपटाची खास वैशिष्टये ठरली होती. सात दशकानंतर पुन्हा एकदा अलौकिक श्रध्देची गाथा ‘अशी होती संत सखू’ चित्रपटाच्या निमित्ताने 17 मे ला रुपेरी पडदयावर दाखल होतेय.