सचिनची धडाकेबाज खेळी

मुंबई: ब-याच दिवसानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची धडाकेबाज खेळी मुबई येथील क्रीडाप्रेमिना पहावयास मिळाली. त्याच्या धडाकेबाज इनिंगच्या जोरावरचा मुंबईने कोलकात्याचा ६५ धावांनी पराभव केला. आयपीएलच्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी वानखेडे स्टेडियमवरचा सामना म्हणजे दुहेरी धक्का ठरला. हा सामना पाहण्यासाठी शाहरुख खानला या सामन्यासाठी वानखेडेवर प्रवेश तर मिळालाच नाही. त्याशिवाय या सामन्यात मुंबई इंडियन्सने धुव्वा उडविल्याने आयपीएलमधील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

मुंबई इंडियन्सच्या ड्वेन स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांनी मुंबईला १३ षटकांत ९३ धावांची सलामी दिली. त्यात सचिनचा वाटा होता २८ चेंडूंत आठ चौकारांसह ४८ धावांचा. स्मिथने ५३ चेंडूंत सात चौकारांसह ४७ धावांची खेळी रचली. सचिन तेंडुलकरने दमदार फलंदाजी करताना एकाच षटकात सलग पाच चौकार मारले. त्याची ही फलंदाजी पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्याच्या फलंदाजीमुळेच मुंबईला वीस षटकांत सहा बाद १७० धावांची मजल मारता आली. या विजयाचा प्रमुख शिल्पकार म्हणून सचिन तेंडुलकरला सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

आयपीएलच्या सहाव्या मोसमात मुंबई इंडियन्सने वानखेडेचा गड अजिंक्य राखण्यात यश संपादन केले आहे. मुंबई इंडियन्सचा हा बारा सामन्यांमधला आठवा विजय असून, वानखेडेवरच्या सामन्यात मुंबईचा हा सलग सहावा विजय ठरला. मुंबईच्या खात्यात आता एकूण आठ विजयांसह १६ गुणांची कमाई झालीय आणि पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर पोचलीय. कोलकाता नाईट रायडर्सचा हा १२ सामन्यांमधला आठवा पराभव ठरला. कोलकात्याच्या खात्यात चार विजयांसह केवळ आठ गुण असून, गतविजेत्यांना यंदाच्या मोसमात साखळीतच गारद व्हावे लागणार आहे.