राज्यातील विरोधीपक्ष एकत्रित आणणार-फडणवीस

मुबई – गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रातील एनडीएप्रमाणे राज्यात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आगामी काळात महाराष्ट्र लोकशाही आघाडी बनविण्यात येईल , अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी फडणवीस म्हणाले , ‘ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या मतांमध्ये फूट पडू नये , यासाठी शिवसेना , भाजप आणि आरपीआय ही महायुती कायम आहेच ; पण या सर्व पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन करण्यात येईल. मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पक्षाच्या नुकसान करणा-या नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात थारा दिला जाणार नाही. ज्या नेत्यांना लढण्याची इच्छा नाही , त्यांनी बाजूला व्हावे. तर सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी.’

यावेळी भाजपचे नेते नितीन गडकरी म्हणाले, ‘ आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आरपारची लढाई आहे. जातीयवादावर निवडणुका लढविता येत नाहीत. विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे गेले तरच लोक आपल्यासोबत येतील. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे.’