पाकिस्तानात सभेवेळी बॉम्बस्फोट : १५ ठार

इस्लामाबाद, दि. ७ – मध्यवर्ती पाकिस्तानात आज निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण मृत्युमुखी
पडले. याशिवाय, ७० जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात ११ मे यादिवशी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमियात उलेमा-इ-इस्लाम-फज्लच्या वतीने कुर्रम या आदिवासी विभागात सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सुरू असतानाचा बॉम्बस्फोट झाला. त्यात निवडणूक लढवणारे दोन उमेदवारही किरकोळ जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, आज
झालेल्या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी या स्फोटाच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.