कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी चुरस

कल्याण – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गेल्या काही दिवसांपासून झालेली कल्याण डोंबिवलीतल पडझड सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्याची मुदत काही तासांवर आली असताना हे मानाचे पद आपल्यालाच मिळावे यासाठी शिवसेनेच्या चार नगरसेविकांत चुरस आहे. यामध्ये डोंबिवलीतील कविता म्हात्रे, कल्याणमधील कल्याणी पाटील, पुष्पा भोईर व विद्यमान महापौर वैजयंती गुजर यांच्या पैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील महापौरपद महिला ओबीसी वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे आता नगरसेविकांमध्येही या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरपदाची निवडणूक ११ मे रोजी होत आहे. त्यासाठी मंगळवारी अर्ज भरले जातील. लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा बालेकिल्ला ढासळला तरी कल्याण मतदारसंघातून आनंद परांजपे निवडून आले. त्यानंतर मात्र कल्याण डोंबिवलीत पक्षाची पार वाताहत झाली. विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम , पूर्व आणि ग्रामीण या तिनही जागा शिवसेनेने गमावल्या. तांत्रिकदृष्ट्या सेनेत असलेले खासदार परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलाय. त्यामुळे ही पडझड सावरण्यासाठी शिवसेनेला सुसंस्कृत व सुशिक्षित चेहरा महापौरपदासाठी द्यावा लागेल.

कल्याणमधून शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आल्याने शहर शाखेने या पदासाठी कल्याणातील नगरसेविकेची निवड करावी , अशी मागणी केल्याचे समजते. सध्या कविता म्हात्रे , पुष्पा भोईर , कल्याणी पाटील व वैजयंती गुजर यांची नावे या पदासाठी स्पर्धेत आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याबाबत कमालीची उत्सुकता आहे. तर भाजपमधून उपमहापौरपदासाठी राहुल दामले यांचे नाव आघाडीवर आहे.