नवी दिल्ली- येत्या लोकसभा निवडणुकीत पण भाजपने ‘हिंदुत्व’चा मुद्दा बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. काही दिवसापूर्वीच भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी ‘मी फक्त हिंदूंचा नेता नाही’, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही ‘हिंदुत्व हा भाजपसाठी निवडणुक मुद्दा असणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे भाजपने ‘हिंदुत्व’चा मुद्दा बाजूला ठेवल्याचे दिसते.
काही दिवसापूर्वी हरिद्वारमध्ये हजारो संतांच्या साक्षीने मोदी यांनी सर्वांच्या कल्याणाची भाषा केली होती. मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप आता पुढे जाणार असे दिसत आहे. तसे संकेत राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी एका मुलाखती प्रसंगी दिले आहेत. राजनाथ सिंह म्हणाले ‘आमची विचारधारा विकासाचीच आहे. त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढणार आहोत. हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. धर्म आणि जातीशी त्याला जोडता येणार नाही, हिंदुत्व हा निवडणुक प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही आणि आम्ही तसे करणारही नाही.’
भाजप संसद चालवू देत नाही हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. संसदेतल्या कोंडीला भाजप नाही तर काँग्रेस जबाबदार आहे. जर संसदेचे कामकाज व्यवस्थित चालावे, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.