खाबुगिरी संपत नाही

केन्द्रातल्या संपु आघाडीचे नाव संयुक्त पुरोगामी आघाडी असले तरी या संपुआघाडीची खाबुगिरी संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. एखादे प्रकरण संपतेय ना संपतेय तोपर्यंत दुसरे प्रकरण उद्भवते. आता आता कोळसा खाण ‘प्रकरण संपत आले होते तोपर्यंत आता एक नवा रेल्वे घोटाळा निर्माण झाला. रेल्वे मंत्री पवन बन्सल यांच्या पुतण्याला रेल्वेतल्या एका अधिकार्‍याकडून 90 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून या पुतण्याला पकडलेच पण नंतर आणखी दोघांनाही अटक केली. आजकाल अनेक नेत्यांच्या पुतण्यांनी आपल्या काकांना अडचणीत आणायला सुरूवात केली आहे. आता रेल्वे मंत्र्यांच्या पुतण्याने त्यांना अडकवले. रेल्वेत काम करणार्‍या एका मोठ्या इंजिनियरला आपल्या आहे त्या खात्यातून अधिक मलईदार खात्यात बदली हवी होती. त्याला आता आता रेल्वे बोर्डात बदलून पाठवण्यात आले होते. तिथे केवळ नियोजन करावे लागते.

नियोजनात पैसा मिळत नसतो. नियोजना प्रमाणे कामे निघतात आणि त्या कामांची टेंडर्स काढली जातात तिथे वरचा पैसा खूप मिळतो. या अभियंत्याला वाळवंटातली नोकरी नको होती. अधिक हिरवळ असलेल्या खात्यात जिथे वर्षाला 2 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जातात तिथे नोकरी हवी होती. दोन हजार कोटी रुपयांची कामे काढली जाणार असतील तर किमान 10 कोटीची कमाई होऊ शकते. तेव्हा ही अधिक कमाईची पोस्टिंग मिळवण्यासाठी 2 कोटी रुपये द्यावे लागले तर नुकसान काहीच नाही. म्हणून त्याने दोन कोटीची लाच दिली. ती दिली रेल्वेमंत्री पवन बन्सल यांच्या पुतण्याला. अर्थात ही लाच पूर्ण दिली नाही. तिचा 90 लाखाचा पहिला हप्ता पोचता केला. तो पोचताच पोलिसांनी छापा टाकून ते पैसेही हस्तगत केले आणि पुतण्याला अटक केली. अशा लाभदायक बदलीसाठी एवढी रक्कम दिली गेली असेल का ? असा प्रश्‍न विचारला जातो. कारण महाराष्ट्रातही बदलीसाठी पैसे दिले घेतले जातात.

मध्यंतरी महाराष्ट्राचे एक गृह राज्यमंत्री फार तकतक करीत होते. आपले गृहमंत्री आपल्याला आपला अधिकार वाटून देत नाहीत अशी त्यांची तक‘ार होती. फारच कटकट व्हायला लागली म्हणून मु‘यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना या कनिष्ठ मंत्र्याला काही अधिकार देण्यास सांगितले. अशा अधिकार वाटपाची यादी फार मोठी असते. पण गृहमंत्र्यानी या यादीतल्या कामांची वाटणी केलीच नाही. केवळ बदल्या करण्याचे काही अधिकार त्या राज्यमंत्र्याला दिले. तेवढ्या एका अधिकारावर राज्यमंत्री खुष झाले. कारण त्यांना बाकीचे अधिकार नकोच होते. त्यांना केवळ बदल्या करण्याचे अधिकार हवे होते कारण बदल्या करण्यात मोठी कमाई असते. देशात सर्वत्र हा प्रकार चालतो. तेव्हा 2 हजार कोटीची कामे काढण्याचे अधिकार असलेल्या पदावर बदली हवी असेल तर दोन कोटी रुपये दिले गेले असतील यात नाही नवल नाही. पण अशी बदली कोण करू शकतो ? मंत्र्यांचा पुतण्या हे काही मोठे पद नाही. आपल्या महाराष्ट्रात मंत्र्यांचे पुतणे खूप आहेत आणि ते काकांच्या जीवावर बरेच अधिकार भोगत असतात.

तेव्हा या अधिकार्‍याला रेल्वे मंत्र्यांचा पुतण्या हे बदली करून घेण्याचे योग्य ते माध्यम वाटले असेल तर त्यात काही चूक नाही. कारण पैसे पुतण्याला दिले आहेत ते काही पुतण्या बदली करू शकतो म्हणून नव्हे. तो काकांचा वशिला लावू शकतो, तो मंत्री काकांचा सर्वात निकटचा माणूस असतो म्हणून त्याला बदलीची गळ घातली गेली आहे. शेवटी बदलीचा अधिकार मंत्र्यांना असतो. काही मंत्री अशा प्रकरणात हस्तक्षेप करीत नाहीत. पण ते बदलीसाठी रदबदली करीत असतात. त्यांनी बदली करण्याबाबत शब्द टाकला तर बदलीची ऑर्डर काढणारा निमूटपणे ऑर्डर काढतोच. आता 90 लाख रुपये देऊ केले आहेत ते काकांना पोचवण्यासाठीच आहेत. अन्य कोणाला पैसे देऊन बदली करून घ्यायची असती तर पुतण्याला पैसे देण्याची काही गरज नव्हती. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पवन बन्सल यांचा राजीनामा मागितला आहे.

बन्सल यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत आणि मंत्रिपद सोडण्याचीही तयारी दाखवली आहे. पण खुलासा करताना अंग झटकले आहे. आपला काही संबंध नाही, आपला पुतण्या वेगळा आहे असे म्हटले आहे. तेव्हा त्याने पैसे खाल्ले म्हणजे त्याच्याशी आपला संबंध असतोच असे काही मानण्याचे कारण नाही असे बन्सल यांनी म्हटले आहे. या म्हणण्यात तथ्य आहे. पुतण्याने पैसे खाल्ले आणि काका मंत्री आहेत म्हणून काकांनी राजीनामा द्यावा असे काही नाही. पण येेथे तो युक्तिवाद लागू पडत नाही. कारण येथे रेल्वेतल्या कामासाठी पैसे दिले गेले आहेत. एवढ्या खात्रीने 90 लाखाची रक्कम दिली आहे. याचा अर्थ असे प्रकार नेहमीच चालतात. पुतण्याचे काका मंत्री आहेत म्हणूनच त्यांच्यावर बदली मागणार्‍यांचा विश्‍वास आहे. असे प‘कार या आधी होत आले आहेत हे नक्की. पुतण्याचा असा भ‘ष्टाचार अन्य कोणत्या तरी क्षेत्रातला असता तर काकांना कोणी राजीनामा मागितला नसता. काकांनी राजीनामा देऊ केला आहे पण तो पंतप्रधानांनी नाकारला आहे. नाकारला असला तरी त्यांनी पद सोडावे कारण त्यामुळे पंतप्रधानही कोळसा प्रकरणात पायउतार होतील.