सरबजीतची पाकिस्तानातल्या तुरुंगात झालेली हत्या हा आता दोन देशांच्या दरम्यानचा वादाचा नवा मुद्दा झाला आहे. सरबजितचा मृतदेह भारतात आणला गेल्यानंतर त्याची दुबार शवचिकित्सा करण्यात आली. तेव्हा मिळालेला अहवाल आणि पाकिस्तानातल्या चिकित्सेचा अहवाल यात जमीन अस्मानचा प्रयत्य आहे. पाकिस्तानात सरबजितला मारहाण झाली असली तरी पाकिस्तानने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मरण आल्याचे तर म्हटले आहे. भारतात आल्यानंतर करण्यात आलेल्या शव चिकित्सेत प्रथम तर त्याच्या अंगावर छळाच्या खुणा आढळल्याच पण नंतर केलेल्या अटोप्सीमध्ये त्याचे काही अंतर्गत अवयव बेपत्ता झाल्याचेही आढळले आहे. असा प्रकार व्हायला नको होता. या दोन देशांत राजकीय कारणावरून आणि सीमेवरून कितीही वाद असले तरीही त्याची झळ अशा प्रकारे परस्परांच्या देशात असलेल्या कैद्यांना इतक्या निष्ठुरपणे बसायला नको आहे. अशा प्रकारचे कैदी आणि युद्धकैदी यांना सन्मानाचीच वागणूक दिली पाहिजे असा संकेत आहे.
संघर्षाचा नवा मुद्दा
सरबजितच्या पाठोपाठ भारतात असलेल्या काही पाकिस्तानी कैद्यांचा प्रश्न निर्माण झाला. सरबजितच्या हत्येचा बदला घेण्यास उद्युक्त झालेले भारतीय कैदी भारताच्या तुरुंगात शिक्षा भोगणार्या पाकिस्तानी कैद्यांवर हल्ला करू शकतात. असा प्रकार होऊ नये यासाठी भारत सरकारने अशा पाकिस्तानी कैद्यांना संरक्षण दिले पाहिजे. पण काल अशा एका प्रकारात जम्मू काश्मीरच्या एका तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी कैद्यावर तिथल्याच एका कैद्याने हल्ला केला. दोघांची चर्चा सुरू होती आणि चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि भारतीय कैद्याने त्या पाक कैद्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याला आता विमानाने चंडिगढच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले आहे. सरबजित नंतर हा प्रकार घडला असल्याने आता पाकिस्तानच्या सरकारला ही आरडा ओरडा करायची आणि भारताच्या नावाने बोटे मोडण्याची एक संधीच मिळाली आहे. यातून आता परस्परांच्या कैद्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. भारताचे चार हजारावर कैदी पाकिस्तानात आहेत आणि पाकिस्तानचेही शेकडो कैदी भारतात आहेत.
पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून परत आलेल्या काही भारतीय कैद्यांनी पाकिस्तानात भारतीय कैद्यांना फार वाईट वागणूक मिळत असल्याचे म्हटले आहे. भारतातले अनेक कैदी पाकिस्तानच्या तीन चार मोठ्या तुरुंगात आहेत. त्यातले बहुसं‘यच काय पण सगळेच कैदी असेच भटकत पाकिस्तानात आलेले आहेत. ते काही हेरगिरी करीत नव्हते. त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप लावण्यात आले असून त्यांना कैदेत कुजवत ठेवले आहे. त्यातल्या काही लोकांची शिक्षा संपली आहे पण तरीही त्यांना सोडले जात नाही. खरे तर पाकिस्तानातली भारतीय वकिलात या बाबत सावध असायला हवी. काही भारतीयांना पकडले असले आणि त्यांना शिक्षा झाली असली तरीही त्यांना किती शिक्षा झाली आहे आणि ती संपल्यानंतर सोडले जात आहे की नाही याची नोंद या वकिलातीने ठेवायला हवी पण तिच्यातले अधिकारी या बाबत पुरेसे सावध नाहीत. त्यामुळे अनेक कैदी अक्षरश: खितपत पडले आहेत. त्यातल्या काहींना तर वेड लागले आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा एकदा आला होता. पाकिस्तानचे काही नागरिक भारताच्या तुरुगात आहेत. त्यांच्या शिक्षा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात यावे अशी मागणी करणारा अर्ज समोर आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व पाकिस्तानी नागरिकांना शिक्षेची मुदत संपल्यानंतरही अडकवून ठेवणे हे अन्यायकारक आहे असे म्हटले. ते पाकिस्तानी असले तरी आणि पाकिस्तानी हे आपले शत्रू राष्ट्र असले तरीही या कैद्यांना माणूस म्हणून काही अधिकार आहेत आणि त्यानुसार शिक्षेची मुदत संपल्यानंतर बाहेर सोडले जाणे हा त्यांचा हक्क आहे असे भारताच्या न्यायालयाने म्हटले. मात्र याच वेळी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अशी काही भूमिका घेऊन तिथल्या अशाच भारतीय कैद्यांना सोडण्याचा आदेेश द्यावा अशीही मागणी करण्यात आली. त्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने चांगली भूमिका घेतली आणि दोन्ही देशातले अनेक कैदी सोडण्यात आले. नंतर हीच प्रकि‘या सुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पण तसे घडले नाही कारण वारंवार असे लक्षात आले आहे की, अशी माणुसकीची वागणूक मिळण्याच्या बाबतीत न्यायालये उदार असली तरीही त्यानुसार काही निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात नोकरशाही आडवी येत असते. सरबजितला वाईट वागणूक मिळाली असली तरीही आता तसे कोणाच्याही बाबतीत घडू नये.
