नवी दिल्ली- तिहार जेलमध्ये कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी काही कैदी जखमी झाले आहेत. त्याला गंभीररित्या मारहाण झाल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. कैद्याच्या मृत्यूमुळे तिहार जेलमधील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
तिहार जेलमध्ये हाणामारी; कैद्याचा मृत्यू
शुक्रवारी दुपारी तिहार जेलमधील जावेद या कैद्याचे त्याच्या साथीदारांबरोबर भांडण झाले. बाचाबाची वाढल्यानंतर इतर कैद्यांनी जावेदला बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत जावेदला दिल्लीतील दिनदयाळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथेच गंभीर जखमांमुळे शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या इतर कैद्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मारहाणीमध्ये कोणत्याही पाकिस्तानी कैद्याचा सामावेश नसल्याचे स्पष्टीकरण तिहार जेल प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. जेल प्रशासनाच्या उच्च अधिका-यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
