निखिल खडसे यांची आत्महत्या

जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांनी मुक्ताई तालुक्यातील कोथळी येथिल घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली . ही घटना
बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी , अशी शक्यता व्यक्त होत आहे.

निखिल खडसे यांनी २०११ मध्ये मनीष जैन यांच्या विरोधात विधान परिषदेची निवडणूक लढवली होती . मात्र, त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ते जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य होते. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निखिल खडसे यांनी उजव्या कानाजवळ गोळी झाडली. हा आवाज ऐकताच त्यांची आई व पत्नी यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले .

त्यानंतर लगेचच कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी येथील गोदावरी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या टीमने ३५ मिनिटे त्यांना लाइफ सपोर्ट दिला. मात्र , सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर सायंकाळी ६ .०५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले . दरम्यान , निखिल यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.