नस सापडली

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक नेमके काय केले म्हणजे हे संकट पुन्हा येणार नाही या दिशेने काम करणार्‍या लोकांना आता नेमके काय करावे याचा बोध झाला असून त्यांनी राज्याच्या विविध भागातल्या तणावांतला गाळ काढण्याची मोठीच मोहीम हाती घेतली आहे. तिचा लाभ नक्कीचा होणार आहे. आपण पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन नीट केले नाही म्हणून आपल्यावर अशा दुर्भिक्ष्याला तोंड देण्याची वेळ आली आहे ही जाणीव पूर्वीपासून झालेली आहेच पण आता या वेळी ती अधिक तीव‘ झाली आहे. त्यातून हा नवा मार्ग सापडला आहे. आता महाराष्ट्रात पाण्यावरून खूप वाद जारी आहेत. नाशिक जिल्ह्यातले गोदावरी नदीवरील बंधार्‍यांचे पाणी खालच्या जायकवाडी धरणात सोडावे की नाही यावर खल जारी आहे कारण तसे केल्याने जायकवाडी धरणात पाणी येऊन मराठवाड्याची गरज भागेल पण नाशिक शहराला पाणी मिळणार नाही अशी नाशिककरांची तक‘ार आहे. ही तक‘ार फार नेमकी आहे असे नाही कारण जायकवाडीत पाणी सोडले तरी वरच्या धरणांत पाण्याचा मोठा मृत साठा राहतोच. असाच वाद उजनी धरणावरून जारी आहे कारण उजनी धरणात पाणी नाही आणि त्याच्या वरची पुणे जिल्ह्यातली धरणे पाण्याने 60 ते 70 टक्के भरली आहेत. या विषमतेमुळे वाद निर्माण झाला. सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी मुंबईत उपोषणाला बसले आणि एकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने उजनी धरणात पाणी सोडण्याचा आदेश दिला.

या पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर यावरूनही वादंग आहेच. असे असले तरीही राज्यातल्या काही धरणांच्या जलाशयांत पाणी शिल्लक आहे. उजनी आणि जायकवाडी ही राज्यातली मोठी धरणे आहेतच पण कोयनाही असेच मोठे धरण आहे. या धरणात आता 10 अब्ज घनफूट पाणी वापराविना पडून आहे. त्याच्या वापराची कसलीही योजना सरकारकडे नाही. परिणामी ते पाणी तसेच राहणार आहे. गोदावरी नदी मराठवाड्यातून वहात आंध‘ात जाते आणि नंतर ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात शिरते. तिथेही तिच्या पाण्याच्या वापराचे कसलेही नियोजन करण्यात आलेले नाही. तिथे नियोजन केल्यास 156 अब्ज घनफूट पाणी मिळू शकते. असे सगळ्या पाण्याचे ऑडिट केले तर आपल्या असे लक्षात येईल की आपल्याला निसर्गातून जेवढे पाणी मिळते त्याच्या 13 टक्के पाण्याचा साठा करण्याच्या योजना आपण आखल्या आहेत. म्हणजे आपण मिळालेल्या पाण्याच्या 87 टक्के पाणी सोडून देतो. ते अडवण्यासाठी मोठ्या योजना आखाव्या लागणार आहेत पण तेवढी गुंतवणूक करण्याची आपली स्थिती नाही.

प्रत्यक्षात आपल्या देशात 4 हजार अब्ज घनफूट पाऊस पडतो. त्यातले 80 टक्के पाणी नदीतून वाहते पण आपण त्यातले जवळपास सगळेच पाणी सोडून देतो म्हणून आपण गरीब आहोत. एखादे वर्षी पाऊस कमी पडला की आपण बेजार होऊन जातो. शेवटी यावर आपण काय उपाय शोधणार ? आजवर असे मानले जात होते की, धरणे बांधून पाणी अडवणे हाच एकमेव उपाय आहे. तो तर शक्य नाही मग आपण काय करायचे ? आपण आपल्या पातळीवर काही तरी हालचाली करीत नाही तोपर्यंत काही ही कोंडी फुटत नाही. म्हणून लोकांत चर्चा सुरू झाली. काही दैनिकांनीही लोकांना दुष्काळावर कायमचा तोडगा काढण्याबाबत उद्युक्त केले. अनेक चर्चासत्रे, परिषदा आणि प्रत्यक्षातले अनुभव यांतून असा विचार पुढे आला की सरकार काही तरी करील म्हणून आपण वाट पहात राहिलो तर असा तोडगा कधीच निघणार नाही. आता स्थानिक पातळीवर काही तरी केलेच पाहिजे. स्वयंसेवी प्रवृत्तीने श्रमदानातून काही तरी करीत नाही तोपर्यंत आपल्याला दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही अशा निष्कर्षाप्रत आपण आलो.

खरे तर गावागावात पाझर तलाव आहेत. ते फार पूवीं खोदले गेले आहेत. त्यांंचे काही फायदे मिळत गेले आणि त्याकडे दुर्लक्ष केेले तर फारसे काही बिघडत नाही याचा अनुभव सर्वांना आला. म्हणून त्या पाझर तलावात साठत जाणारा गाळ आपण कधी पाहिलाच नाही. आता मात्र या साठवणीचा विषय पुढे आला तेव्हा या तलावांत गाळ साचल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे हे लक्षात आले. हा गाळ काढला तर ते तलाव पूर्ववत होतील, त्यात पाणी साठेल आणि त्यामुळे आसपासच्या विहिरींना चांगले पाणी राहील असा विचार पुढे येऊन लोक स्वत:हून हा गाळ काढायला लागले आहेत. तो शेतात नेऊन टाकण्याने शेताचाही फायदा होतो आणि तलावही खोल होतो. असा दुहेरी लाभ होत असल्याने राज्याच्या विविध भागात पाझर तलाव खोल करून त्यातला गाळ काढण्याची मोठी मोहीम सुरू झाली आहे. यंदा अनेक तलाव पूर्ण कोरडे पडले आहेत. हीही त्या दृष्टीने एक इष्टापत्ती ठरलेली आहे. कारण त्यात थोडे जरी पाणी असते तरी त्यातला गाळ बुडातून काढता आला नसता. या मोहिमेचा फायदा यंदाच्या पावसाळ्यातच नाही तर त्यानंतरच्या काही पावसाळ्यात पुन्हा नव्याने गाळ साचेपर्यंत होणार आहे. एक मार्ग सापडला आहे.