चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना संस्कृती कलादर्पण सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना यंदाचा संस्कृती कलादर्पण
सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
चित्रपटक्षेत्रातल्या त्यांच्या पितृतुल्य कामगिरीला विनम्र अभिवादन
म्हणून हा सन्मान संस्कृती कलादर्पणतर्फे देण्यात येत असल्याचे
प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष अर्चना नेवरेकर यांनी सांगितले. मानपत्र,
सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. येत्या २९ एप्रिलला रवींद्र
नाट्यमंदिर इथे होणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान
दिला जाईल.यंदा या पुरस्काराचे तेरावे वर्ष असून यापूर्वी हा पुरस्कार
पंडित जसराज, सितारा देवी,सुलोचना दीदी,रमेश देव-सीमा देव, जयश्री
गडकर,बाबासाहेब पुरंदरे,आत्माराम भेंडे,श्रीनिवास खळे आदी मान्यवरांना
देण्यात आला आहे.

परिचय :-चित्रपट दिग्दर्शक राजदत्त मूळचे विदर्भातील. धामणगाव येथे
सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण
नाव. आई प्रभावती. वडील अंबादासपंत रेल्वेत नोकरीत असल्याने विविध ठिकाणी
बदलीमुळे वास्तव्य, परंतु शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे
व्यतीत झाला.लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने अनेक नाटकांत सहभाग.
चित्रपटक्षेत्रात काही तरी करावे, या उद्देशाने १९६५ च्या आसपास
कोल्हापूर येथे चित्रपटातील भालजी पेंढारकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता आणि
दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांच्या मार्गदर्शनात चित्रपट क्षेत्रात
त्यांचा प्रवेश झाला. खर्याा अर्थाने तो परीसस्पर्श होता. दत्तात्रय
अंबादास मायाळू ‘राजदत्त’ झाले. ‘मायाळू’ या शब्दाप्रमाणे ममतेचा झरा सतत
वहात होता. प्रचंड मेहनत, परिश्रम, रा. स्व. संघाच्या संस्कारातून
मिळालेली ‘शिस्त,’ साधी राहाणी, स्नेहपूर्ण व्यवहार यामुळे
सिनेसृष्टीच्या या मायावी जगात धवल चारित्र्याचा हा ‘मायाळू’भक्कमपणे उभा
राहिला. आपल्या कर्तृत्वाने आगळे वेगळे आदराचे स्थान त्यांना प्राप्त
झाले. ‘मधुचंद्र’ या पहिल्याच चित्रपटाला त्यांना उत्कृष्ट चित्रपटाचा
पुरस्कार मिळाला. आपल्या आत्मीय प्रेमळ स्वभावामुळे अनेक कलावंतांशी
त्यांचे स्नेहाचे संबंध होते. सुप्रसिद्ध गायिका स्वरसम्राज्ञी श्रीमती
लता मंगेशकर यांच्या सढळ मदतीने ‘घरची राणी’हा चित्रपट दिग्दर्शित केला
आणि त्या चित्रपटालाही उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नंतर मात्र
त्यांनी मागे वळून पाहिले नाही.