निस्सान डॅटसन नव्या स्वरूपात सादर होणार

नवी दिल्ली दि.२५ – जपानी कारमेकर निस्सान त्यांचे लोकप्रिय डॅटसन कार मॉडेल खास भारत, रशिया, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसाठी नव्या स्वरूपात सादर करणार आहे. ही मॉडेल्स २०१३ च्या मध्यावर बाजारात आणली जातील असे समजते.

नव्याने कार घेऊ इच्छीणार्यात मध्यमवर्गीयांना कंपनीने आपले भविष्यातील ग्राहक म्हणून लक्ष्य केले असून भारतीय बाजारातील हा नवा ग्राहक अत्यंत डिमांडिग आहे असे कंपनीच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. नवीन स्वरूपात येणारी डॅटसन ही भारतीय ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच बनविली जात असून तिची किंमत साधारण पणे चार लाख रूपयांपर्यंत असेल. सध्या भारतीय बाजारात मारूती सुझुकीची अल्टो सर्वाधिक पसंतीची कार असून तिच्याबरोबर तसेच शेव्हरोलेटच्या स्पार्क, ह्युंदाईच्या इऑन यांच्याशी या गाडीला स्पर्धा करावी लागणार आहे.

कंपनी अधिकार्यां नी दिलेल्या माहितीनुसार वरील देशांच्या बाजारपेठांचा अभ्यास करून कंपनीने पाच नवी मॉडेल्स बाजारात आणण्याचे ठरविले आहे पैकी तीन मॉडेल्स येत्या दोन वर्षात बाजारात आणली जाणार आहेत. भारतासाठी ही मॉडेल्स कंपनीच्या चेन्नई जवळील रेनॉल्ड निस्सान प्रकल्पातच उत्पादित करण्यात येणार आहेत. कालांतराने डॅटसन स्वतःचे विक्री नेटवर्क स्वतंत्रपणे उभे करणार आहे असेही समजते.