हिटमॅनचे दमदार शतक; मिळवले डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान


चेन्नई – इंग्लंडने भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला. या पराभवाचे भारतीय फलंदाजांची हाराकिरी हे महत्त्वाचे कारण होते. सलामीवीर रोहित शर्माच्या त्या सामन्यातील सुमार फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत या टीकाकारांना दमदार उत्तर दिले. रोहितने गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर आक्रमक पवित्रा घेत कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. त्याचे चेन्नईच्या मैदानावरील हे पहिलेच शतक ठरलो.

शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला आले. शून्यावर गिल माघारी परतला. पण रोहितने आपला दमदार खेळ सुरू ठेवला. वेळोवेळी वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा समाचार घेत त्याने अर्धशतक झळकवले. कसोटी कारकिर्दीतील रोहितचे हे १२ वे अर्धशतक ठरले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर रोहितला अजिंक्य रहाणेने साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने दमदार शतक ठोकले.

१३० चेंडूत रोहितने १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक ठोकले. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन या यादीत ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ एवढी आहेत. तर यादीत वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली ७७.६च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहितला ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणे शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने शतकी मजल मारली.