कराचीत सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ

कराची दि.२३ – मेमध्ये पाकिस्तानात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूकात कराची शहरात सर्वाधिक संख्येने संवेदनशील मतदारकेंद्रे आहेत असे सिध प्रांताचे अतिरिक्त पोलिस महासंचालक गुलाम शबीर शेख यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले कराची शहरात या निवडणुकीत सुमारे ४ हजार मतदान केंद्रे असतील मात्र त्यातील निम्म्याहून अधिक कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्यामुळे निवडणूक काळात निवृत्त पोलिस अधिकारी तसेच नामवंत खासगी सुरक्षा संस्थाची मदत घेतली जाणार आहे.

कराची शहराच्या पश्चिम भागातील विशषतः बदिया, इत्तेहाद, ल्यारी, मंगोपीर आणि सिते येथील मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या भागात गुन्हेगार आणि दहशतवाद्यांचे तळ आहेत त्यामुळे हा भाग कायमच अशांत असतो. संवेदनशील मतदारसंघांची यादी तयार करण्यात आली आहे आणि निवडणूक काळात लष्कराच्या तुकड्यांनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. अगदीच वेळ पडली तर लष्करी तुकड्यांना तेथे पाचारण केले जाणार आहे.