पुणे – गेल्या काही दिवसपासून सोन्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली आहे. नागरिकांच्या खरेदीचा उत्साह कायम आहे. अचानक मागणी वाढली असल्याने सोन्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अजूनही सोन्यासाठी बुकिंगच सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात सोने उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.
सोन्याच्या दरात रविवारी दोनशे रुपयांची वाढ होऊन तो २६ हजार ९०० रुपये तोळ्यावर गेला आहे. गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे भारतात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. सोने २६ हजार रुपयांच्या पातळीजवळ आले होते. त्यामुळे ही खरेदीची संधी असल्याने ग्राहकांनी सराफी दुकानांमध्ये रांगा लावून सोने खरेदी केली होती. गुरूपुष्यच्या मुहूर्तावरही मोठी मागणी आली. त्याचा परिणाम सोन्याच्या उपलब्धतेवर झाला असल्याचे समजते.
सध्य परिस्थितीत सोन्यासाठी बुकिंग सुरू आहे. सोन्याचा पुरवठा कमी होत आहे. मुंबईहून अपेक्षित पुरवठा का होत नाही , हे स्पष्ट झालेले नाही. पुढील दोन दिवस बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बुधवार-गुरूवारपर्यंत पुरवठा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्ध सोन्याच्या पुरवठ्यावर मर्यादा आहेत. सध्या चार ते पाच दिवसांचे वेटिंग आहे. पुढील आठवड्याभरात उपलब्ध सोन्याचा तुटवडा कमी होईल असे सांगण्यात येते.