
आपल्या देशात आज जे प्रकार सुरू आहेत ते पहायला बहिणाबाई चौधरी हयात नाहीत पण त्या हयात असत्या तर त्यांनी पुन्हा एकदा नव्या कळवळ्याने प्रश्न केला असता, ‘माणसा माणसा, कधी व्हशील माणूस?’ त्यांच्या काळात माणसे स्वार्थी झाली होती. शेतकर्यांना नाडत असत, गरिबांंना लुटत असत ते पाहून बहिणाबाईंचे हृदय कळवळले आणि त्यांनी माणसाला हा प्रश्न केला. पण आता माणूस जनावरांसारखा वागायला लागला आहे. माणूस हा संस्कृती निर्माण करणारा प्राणी आहे असे आपण म्हणतो पण आता तो प्रगत झालाय असे म्हटले जात असतानाच संस्कृतीचा मार्ग सोडून विकृतीच्या आहारी जायला लागला आहे. माणसापेक्षा जनावर बरे म्हणण्याची वेळ आली आहे. समाजातले काही लिंगपिसाट लोक मोकाट सुटले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाला आणि सारा देश हादरला. अर्थात हा प्रकार दिल्लीत घडला म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली. तशी ती मिळणे सहज शक्य होते पण असे किती तरी प्रकार ग‘ामीण भागात मोठ्या प्रमाणावर होत असतात. पण वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आपले कॅमेरे सावरत तेवढ्या सुदूर भागात पोचत नाहीत. त्यामुळे त्या बातम्या वाहिन्यांवर येत नाहीत. पण म्हणून त्यांचे गांभीर्य कमीही होत नाही.
दिल्लीतल्या बातम्या मात्र पटकन वाहिन्यांवर स्थान मिळवू शकतात. अर्थात ही त्या माध्यमाची मर्यादा आहे. यावर काही लोक वाद निर्माण करतात. दिल्लीतला बलात्कार हा गंभीर असतो आणि भंडार्यातला बलात्कार काय कमी गंभीर असतो का ? असा खोचक प्रश्न विचारला जातो पण या खोचक प्रश्नातले वास्तव मान्य करूनही असे म्हणता येईल की, कोणत्याही वाहिनीच्या पत्रकाराने किंवा संपादकाने भंडार्याचा बलात्कार दिल्लीपेक्षा कमी गंभीर आहे असे कधीही म्हटले नाही. दोन्ही बलात्कार सारखेच गंभीर आहेत हे त्यांना मान्यच आहे. पण अशा वेळी त्यांनी काय करावे ? त्यांना ही अडचण केवळ बलात्काराच्याच प्रकरणात जाणवते असे नाही. इतरही अनेक बातम्यांच्या संदर्भात ती जाणवतच असते. पण भंडार्यातल्या बलात्काराचे तपशील त्यांना जमवता येत नाहीत आणि दाखवता येत नाहीत म्हणून दिल्लीतल्या बलात्काराच्या बातम्याही त्यांनी देऊ नयेत असे तर काही म्हणता येणार नाही. त्यांना जेवढे जमते तेवढे ते करत आहेत. या बातम्यांच्या वार्तांकनात काही पक्षपात आहे असे कोणी म्हणत असले तरीही ते जेवढे वार्तांकन करीत आहेत त्याचा काही ना काही उपयोग होत असतोच हे नाकारता येत नाही.
डिसेंबरमध्ये झालेल्या प्रकाराचे वार्तार्ंंकन करण्याने केवळ दिल्लीतच नाही तर सार्या देशातच जागृतीची एक लाट उसळून आली. बलात्काराचा कायदा कडक करण्यात आला. आपण भंडार्याच्या बातम्या देऊ शकत नाही त्या अर्थी आपण दिल्लीतल्याही बातम्या देऊ नयेत असे त्यांनी ठरवले असते तर हे घडलेच नसते. आता कायदा बदलल्याने काही लाभ होणारच असेल तर तो सगळीकडे होणार आहे. त्याचा लाभ केवळ दिल्लीतच होणार आहे असे नाही तर भंडार्यासह सार्या लोकांना होणार आहे. केवळ दिल्लीतल्या बातम्या देण्याने काही चांगले घडत असेल तर त्या कथित पक्षपाताकडेही आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. असो. हा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण असे की डिसंेंबरनंतर आता पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकाराने दिल्लीत त्याच जनप्रक्षोेभाची पुनरावृत्ती झाली आहे. पुन्हा एकदा जनतेचे एकत्र येणे, त्यांची निदर्शने, मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे काढणे, असे आंदोलन जारी आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार झाला की, जनता पेटून उठते. खरे तर ही एक स्वागतार्ह बाब आहे. कोणावर तरी अन्याय झाला म्हणजे लोक रागावतात, मला काय त्याचे म्हणून घरात बसत नाहीत हे बरे आहे.
मागेही असाच प्रकार घडला आणि आताही हजारो तरुण तरुणी रस्त्यावर आले आहेत पण आता या प्रकाराने फार मोठा वैचारिक मुद्दा समोर येणार आहे. डिसेंबर मध्ये रस्त्यावर उतरलेल्या जमावाने बलात्काराच्या संबंधातला कायदा कडक करण्याची मागणी केली होती. सरकार या मागणीपुढे नमले. सरकारने नवा कायदा केला. जमावाची मागणी पुरी केली. या अत्याचारांना कायदाच जबाबदार आहे अशी त्यावेळच्या जमावाची भावना होती. त्यावेळी ही भावना योग्य नाही असेही काही लोकांचे म्हणणे होते पण जमावाच्या मोठ्या आवाजासमोर हे लहान आवाज विरले. कायदा होऊन काय झाले ? केवळ कायदा झालाय एवढेच नाही तर काही प्रकरणात जमावाच्या मागणीनुसार बलात्कार आणि खून अशा दुहेरी अपराधाबद्दल काही आरोपींना फासाची सजा सुनावण्यात आली. एवढे होऊनही अत्याचाराच्या प्रकारात काहीही कमतरता नाही. दिल्लीत दररोज एक या प्रमाणात अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. आता जमाव रस्त्यावर उतरला आहे. त्याला आता कायदा कडक करण्याची मागणी करण्यात काही अर्थ नाही असे लक्षात आले आहे. त्यांनी आता पोलीस अधिकार्यांना लक्ष्य केले आहे. पण त्याचाही काही उपयोग नाही कारण माणसाला माणूस करणारा संस्कार लोपला आहे.