
नवी दिल्ली – सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, संसदेचे आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार पोहोचले आहेत. पण, दिल्ली पोलिसांनी या सर्वांना सीमेवरच अडवल्यामुळे आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला जाणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखले
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदारांचा शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदारांमध्ये आहेत. यानिमित्ताने विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार एकत्र आले आहेत. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी यासर्वांना तीन किमी आधीच रोखले आहे. पोलिसांची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाहीवर होत असलेला मोठा हल्ला असून त्यावर कोणी बोलत नसल्याचे पंजाबमधील एका खासदाराने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आम्ही येथे गडबड करायला आलो आहोत की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आले आहे. अन्नदाता सुखी भवः असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. पण, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीनं वागतंय हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करत आहोत की यावर वेगळी चर्चा व्हावी. पण सरकार यासाठी तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चाच करु नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल एवढी कठोर बंधन येथे घातली आहेत. असंवेदनशील हे सरकार आहे, सरकारमधील लोकांना शेतकरी आपला वाटत नाही. आम्हाला पुढे जाऊ दिले नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे जाणार आणि येथील परिस्थिती समजावून सांगणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
