पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – रिक्षा चालक हा जनतेची सेवा करणारा कामगार आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या रिक्षा चालकाच्या सेवेला सामाजिक सेवेचा दर्जा, रिक्षा चालकांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी 1 जुलै पासून रिक्षाचालक आंदोलन करणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांनी दिली.
राज्यात स्वतंत्र कल्याणकारी मंडळांसाठी रिक्षा चालकआंदोलन करणार
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने आयोजीत राज्यव्यापी मेळाव्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 1993 साली रिक्षा चालकांना सामाजिक सेवेचा दर्जा द्यावा अशी शिफारस पाटणकर यांनी केली होती मात्र वीस वर्षानंतरही त्याला मूर्त स्वरूप मिळालेले नाही याची खंत राव यांनी व्यक्त केली. रिक्षा चालकांसाठी कल्याण्कारी मंडळ स्थापन करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होती दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कल्याणकारी मंडळाची घोषणा केली मात्र त्यात सर्वच चालकांचा समावेश करण्यात आला आहे. या मंडळाला रिक्षा चालकांनी भरलेल्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या रकमेतून या मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याने त्याचा फायदा फक्त रिक्षा चालकांनाच व्हायला हवा आणि ते मंडळ परिवहन विभागाच्या अख्यारित असावे असे स्पष्ट मत राव यांनी यावेळी मांडले.
इले्नट्रॉनिक मीटर सक्तीला विरोध करणार असल्याचे सांगत राव म्हणाले, न्यायालयाने मिटर सक्ती केली आहे ते मेकॅनिकल असावी की इलेक्ट्रॉनिक याचे बंधन नाही त्या मीटरमध्ये फेरफार करता येणार नाही एवढीच न्यायालयाची अट आहे. मात्र काही लोक इलेक्ट्रॉनिक मिटरचीच सक्ती केल्यचे सांगत आहेत. वास्तविक परिस्थिती अशी आहे की, मेकॅनिकल मिटर पेक्षा जास्त फेरफार करण्याची संधी इलेक्ट्रॉनिक मिटरमध्ये आहे आणि याच संधीचा फायदा काही रिक्षा चालक घेत आहेत. कारण इले्नट्रॉनिक मिटरमध्ये फेरफार होत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. भाडे आकारण्यासाठी 1 कि.मी.चा पहिला टप्पा रद्द करून तो दिड किमी करावा अशी मागणी त्यांनी केली.
1 मे पासून भाडेवाढ
हकीम समितीने केलेल्या शिफारशीनुसार महागाई निर्देशंकानुसार दरवर्षी रिक्षा चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार येत्या 1 मे पासून रिक्षा भाड्यात वाढ होणार आहे. सध्याच्या महागाई निर्देशांकानुसार पहिल्या टप्प्यासाठी 2 रूपयांची भाडेवाढ होणार असल्याचे शरद राव यांनी सांगितले.
———————————
