पुणे,दि.21 दीर्घ काळ ब्रह्मवादिनी व समाजाच्या निर्णय प्रमुखपदी असलेली महिला आज समस्यांची बळी ठरत आहे, तिचे मूळचे स्वरूप प्रगट व्हावे समाजाने डोळसपणे उभे राहिले पाहिजे, असे रा स्व संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी आज पुण्यात ‘भारतीय स्त्री: एक मीमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन कॉलेज अभिमतविद्यापीठाचे अध्यक्ष डॉ गो बं देगलूरकर होते. स्नेहल प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले हे पुस्तक सौ सुधा रिसबुड यांनी लिहिले आहे. डॉ भागवत आपल्या भाषणात म्हणाले, या समाजातील संस्कार व नैतिकता यांच्या रक्षणासाठी प्रामुख्याने महिलांनी अखंड परिश्रम केले आहेत. गेल्या काही शतकातील आक्रमणाच्या काळात येथील स्थिती महिलांना प्रतिकूल होती त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करावे लागले. त्याकाळी जे स्त्रीजीवनावर परिणाम झाले त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्यांच्या निराकरणासाठी अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत.
स्त्रीचे कर्तृत्ववान स्वरुप विकसित करुया: सरसंघचालक
अजूनही ग्रामीण भागात व वनवासीभागात महिलाच घरातील निर्णय घेणार्या प्रमुख असतात. पण एकूण जीवनात मात्र पुरुष वर्चस्व संस्कृतीच आहे. पण ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रात, तत्वज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात स्त्रीचे मूळचे स्वरूप प्रगट होण्याची गरज आहे. ते करताना आपण महिलांना पुढे येण्यासाठी वाव देत आहोत, अशी भावना असता कामा नये. तर तिच्या प्रगट होण्यात पुरुष वर्गाचे चिंतन, सहकार्य व त्याना घरातूनही वाव देण्याची भूमिका असली पाहिजे.
संघ आणि महिला या संदर्भात डॉ भागवत म्हणाले, संघाच्या आरंभाच्या काळात संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांना एके ठिकाणी वंदनीय मावशी केळकर भेटल्या, त्यांचा प्रश्न असा होता की, समाजाचा पन्नास टक्के घटक असणार्या महिला संघाच्या कामात का नाहीत. त्यावर डॉक्टरांचे उत्तर असे आहे की, संघाचे कार्यकर्ते व्यवस्थित काम करतात त्यामागे कोणाची तरी आई आणि कोणाची तरी बहिणच काम करत असते. पण संघटनाचे कामाचे स्वरुप निश्चित असल्याने महिलांना त्यात प्रवेश नाही पण महिलांचे कोणी संघटन केले तर आम्ही त्याना सर्व सहकार्य करु. या उत्तरानंतर वं मावशींनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली व तीही आज मोठे काम करीत आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ देग्लूरकर म्हणाले, आज आपण जे महिलांचे स्वरुप बघत आहोत, ते मूळ स्वरुप नाही. महाराष्ट्रात अगदी पुणे जिल्ह्याशी संंबंधित भागातही सातवाहनाच्या काळात नागलिका राणीची सत्ता होती. तिच्या नावाने तिने नाणे काढले होते. ते नाणे आपल्या नाणेघाटात होत होते. महिला नेत्यांनी सारा समाज बांधला आहे व तो व्यवस्थित ठेवला आहे असा काळ इसवीसनाच्या प्रारंभीच्या काळात चारशे वर्षे होता. कालिदास या महाकवीने जगभर कीर्ती मिळवली हे आपण पाहतो पण मूळ उत्तरेतील हा तरुण महाराष्ट्रात आला कसा याचा इतिहास असा आहे की, चंद्रगुप्ताची कन्या कुमारदेवी हे विदर्भ, मराठवाडा व मध्यप्रदेशाची राणी होती. अतिशय कर्तृत्ववान होती तिने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कालिदासास आणले होते. एक हजार वर्षापूर्वीपयर्ंत महिलांना जे स्थान होते ते आपण का गमावले याचा विचार झाला पाहिजे व आज आपण महिलांचा विचार फक्त न्यूज अँगलने करतो तेही बदलेले पाहिजे. शंकाराचार्यांच्या ब्रह्मवादिनी बनून वाद घालणार्या स्त्रियांची स्थिती अशी का झाली हे आपल्याला सापडले पाहिजे आणि त्यात बदल करता आला पाहिजे.
पुस्तकाच्या लेखिका सौ सुधा रिसबुड म्हणाल्या, कुटुंब संस्था व कुटुंबव्यवस्था सांभाळून धरणारी स्त्री आज असहाय्य व दीनदुबळी दाखवली जात आहे. संस्कार सांभाळणार्या या स्त्रीला विकसित शिक्षणापासून दूर ठेवले गेले आहे, ती तिची स्थिती बदलण्यासाठी संघटित प्रयत्न होण्याची गरज आहे.
प्रारंभी स्नेहलप्रकाशनाचे श्री रवि घाटपंाडे यांनी स्वागत केले. सौ सुप्रिया अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
छायाचित्रांच्या ओळी भारतीय स्त्री : एक मीमांसा या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी लेखिका सौ सुधा रिसबुड, सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत, डॉ गो बं देग्लूरकर आणि प्रकाशक श्री रवि घाटपांडे
