उ.प्रदेश लोकसभा निवडणुकीत राहुल – वरूण प्रचार प्रमुख ?

लखनौ दि.२० – पुढील वर्षात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचे पडघम उत्तर प्रदेशात आत्तापासूनच वाजू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणूकात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसची तर भाजपासाठी वरूण गांधी प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे समजते. लोकसभेच्या येथे ८० जागा आहेत त्यातील अधिक जागी आपलाच पक्ष कसा जिंकेल यासाठी नेहरू गांधी घराण्याचे हे दोन वारस प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत.

राहुल गांधी अमेठीचे खासदार आहेत. वरूण गांधी हेही नेहरू गांधी घराण्याचा वारसा घेऊन आले आहेत आणि त्यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरूण १ मे रोजी पहिली सार्वजनिक सभा घेणार असून त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हेही उपस्थित राहणार आहेत ही पहिली सभा वरूण गांधीचा मतदारसंघ असलेल्या पिलभित जवळ होत आहे. मात्र निवडणूक रिंगणात उतरताना वरूण गांधी अमेठी जवळचा सुलतानपूर मतदारसंघ निवडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

वरूण गांधी यांचे वडील संजय गांधी यांनी येथून १९८० साली निवडणूक लढविली होती. हीच जागा पुन्हा मिळविण्यासाठी वरूण गांधी सज्ज झाले आहेत. मागच्या वर्षी २० मे रोजी याच मतदारसंघात वरूण यांची सभा झाली होती आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला होता. तेव्हाच त्यांना या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून पुढे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता असेही समजते.

वरूण गांधी यांचा कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क आहे. मुस्लीम समाजाविरोधातील त्यांची वादग्रस्त विधाने लक्षात घेऊनही त्यांचे तरूण वय, वक्तृत्त्व कौशल्य यामुळे भाजपला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पिलभीत येथे वादग्रस्त विधाने केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली होती तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी हजारोंनी कायर्कर्ते जमले होते व तेव्हा गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार व फायरिंग करावे लागले होते. तेव्हाच त्यांची लोकप्रियता लक्षात आली होती.

सुलतानपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविल्यास त्यांच्या वडीलांशी आजही प्रामाणिक असलेल्या कांही काँग्रेस नेत्यांचा पाठिबा त्यांना मिळू शकणार आहे ही शक्यताही विचारात घेतली आहे. आजपर्यंत राहुल आणि वरूण यांनी एकमेकांवर सार्वजनिक रित्या कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही.