दगडूशेठ गणपती ट्रस्टचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

पुणे दि.२० – केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर भाविक असलेल्या येथील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील गुरांसाठी ट्रस्टने शुक्रवारपासून ६० टन चारा पाठविण्यास सुरवात केली आहे. हा उपक्रम जुलै अखेर सुरू ठेवला जाणार आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. हा चारा पुरंदर तालुक्यातील नवली, पवारवाडी, पिंजोरी ,नलवलवाडी अशा काही गांवात पाठविला जात आहे.

ट्रस्टने दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पुढील नियोजन म्हणून जय गणेश धरणातील गाळ काढण्याचे कामही यापूर्वीच हाती घेतले असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे. या धरणाची क्षमता २१ कोटी लिटर पाणी साठविण्याची आहे व त्यातून २० खेड्यांतील २ हजार नागरिकांना पाणी मिळू शकते. मात्र या धरणात गाळ साठल्याने साठवण क्षमता कमी झाली आहे असे गोडसे यांनी सांगितले. तसेच शिरूर तालुक्यातील जातेगांव येथे ठिबक सिंचनाचे कामही ट्रस्टने हाती घेतले असून हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.

जनावरांसाठी सध्या जो चारा पाठविला जात आहे तो चारा ५२५ जनावरांना आठ दिवस पुरू शकतो. त्यानंतर पुन्हा चारा पाठविला जाणार असून हे काम जुलै पर्यंत सुरू ठेवले जाणार आहे. दरम्यान पाऊस सुरू झाला तर चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.