औरंगाबाद -औरंगाबाद शहरासाठी रोज १४ कोटी लीटर पाण्याचा उपसा आणि दिवसभरात तब्बल १२० कोटी लीटरचे बाष्पीभवन होत आहे. वाढत्या उन्हामुळे जायकवाडी प्रकल्पातील पाण्याच्या बाष्पीभवनाने वेग घेतला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत सापडले आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत सुमारे २०० दशलक्ष घनमीटर पाणी मृत साठ्यातून उपसावे लागेल , असा अंदाज आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच एवढे भीषण संकट निर्माण झाले आहे.
जायकवाडी: पाण्याचे भीषण संकट
जायकवाडीतून औरंगाबाद , जालना , गेवराई , अंबड यांसह विविध ३७ प्रादेशिक पाणी योजनांसाठी पाणी देण्यात येते. पाच एप्रिल रोजी जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांच्या खाली गेला आहे. सध्या जायकवाडी २.१ दशलक्ष घनमीटर (परिमाण- एक घनमीटर = १००० लीटर) पाण्याची घट होत आहे. त्यात १.२ दशलक्ष घनमीटर (सुमारे १२० कोटी लीटर) पाण्याची वाफ होत आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत प्रकल्पाच्या मृत साठ्यातील सुमारे २०० दशलक्ष घनमीटर पाणी वापरले जाईल , असा अंदाज आहे.
जायकवाडी प्रकल्पातील पाणीपातळी घटल्यामुळे प्रशासनाने गेल्या सात दिवसांपासून गाळाचा उपसा सुरू केला आहे. रोज सुमारे २०० ब्रास गाळ उपसला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी प्रकल्पासाठी येणारा पावसाळा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्पात पावसाचे पाणी येईपर्यंत उपसा सुरू राहिला तर येत्या चार महिन्यात म्हणजे जुलैअखेरपर्यंत मृतसाठ्यातील २०० दशलक्ष घनमीटर पाणी कमी होईल.
