पुणे: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या ’म्हैस’ या कथेवर आधारित ’चांदी’ हा चित्रपट लवकरच येतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून ४० ते ४५ वर्षांनंतर पु. लं. देशपांडे यांचे दर्शन प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर घडणार आहे. ते केवळ दिसणार नसून कलाकारांबरोबर अभिनयही करणार आहेत. ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हा चमत्कार घडणार असून हा मराठीतील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
पुलं भेटणार ‘चांदी’ मध्ये
या विषयी बोलताना ’चांदी’चे लेखक अनिल पवार म्हणाले, पुलंची ’म्हैस’ आम्ही मोठ्या पडद्यावर आणतोय. फक्त त्यामध्ये गरज म्हणून आम्ही कथानक गुंफले आहे. म्हणजे पुलंच्या या गोष्टीतील पात्रे कुठून आली असावीत याचा थोडा विस्तार आम्ही केला आहे. हे करताना पुलंच्या लिखाणाला धक्का लागणार नाही, याची काळजीही घेतली आहे.
कथेचा भाग म्हणून चित्रपटात साक्षात पु. लं. देशपांडे दिसणार आहेत. ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही ते साध्य केले आहे. पुलंच्या जुन्या चित्रपटातील शॉट्स घेऊन ही किमया आम्ही साधली आहे.
समीर नाईक दिग्दर्शित या चित्रपटात वैभव मांगले, रमेश देव, भालचंद्र कदम, प्रदिप पटवर्धन, किशोरी अंबिये, उदय सबनीस या कलाकारांसमवेत ८९ कलाकार झळकणार आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने घडणारे पुलंचे दर्शन १५ सेकंदांचे असणार आहे. चांदी मे महिन्यात प्रदर्शित होणार
असल्याचे पवार यांनी सांगीतले.
