
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषि कायद्यांच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. पण या शेतकऱ्यांची काही ढोंगी लोक दिशाभूल करत असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा असून त्या मोर्चाला काहीजण शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा असून काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत आहेत
सोमवारी भंडारदारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कृषी कायद्यांना होणारा विरोध, वीजबिल माफी, भंडारा दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील धान खरेदीची व्यवस्था उद्ध्वस्त केली. हा भ्रष्टाचार बाहेर आला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अर्धे नेते जेलमध्ये जातील. या सरकारमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की हे लोक उद्या समुद्राच्या लाटा मोजायचेही पैसे मागतील, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
राज्य सरकारकडे सामान्य नागरिकांना वीजबिल माफी देण्यासाठी पैसे नाहीत. मग मुंबई व पुण्यातील बिल्डरांना या सरकारने प्रीमियममध्ये सूट देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये कुठून आणले, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. संपूर्ण मंत्रिमंडळ या निर्णयासाठी एकटवले. प्रत्येक मंत्र्याला या निर्णयासाठी किती बुके (पैसे) मिळाले, हे आम्हाला माहिती असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. कोणत्याही गावात अधिकारी वीज जोडणी तोडण्यासाठी आल्यास त्यांना गुलाबाचे फुल द्या आणि गाडीत बसून परत पाठवा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या मनात विदर्भाबद्दल राग आहे. मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची पाहणी करायची होती म्हणून पहिल्यांदा विदर्भात आले. विदर्भातील प्रकल्प या सरकारने बंद केले. विदर्भाला पैसे मिळायचे ते वैधानिक महामंडळही बंद केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
