अमेरिकेचा उत्तर कोरियाला सबुरीचा सल्ला

टोकियो: कोणत्याही प्रकारे युद्धखोरीची भाषा न करता उत्तर कोरियाने शांत राहावे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी इशारा दिला आहे. त्याचबरोबर आशियातील आपल्या सर्व सहकारी देशांची सुरक्षा राखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केरी सध्या उत्तर कोरियाच्या विरोधात समर्थन मिळवण्यासाठी आशियायी देशांच्या दौर्‍यावर आहेत.

दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात केरी जपानमध्ये दाखल झाले होते. उत्तर कोरियाच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांकडून अधिक महत्व दिले जाणे ही बाब अत्यंत दुर्देवी आहे, अशा शब्दांत केरी यांनी खंत व्यक्त केली. उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या जयंतीच्या काळातच केरी यांनी हा दौरा आखला आहे. उत्तर कोरियात सध्या या पार्श्वभूमीवर लष्कराची मोठ्या प्रमाणात परेड आणि इतर उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्या देशात या दिवसाला ‘सूर्य दिन’ असे म्हटले जाते.

दरम्यान, कोरियासोबत अणू मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते, असे अमेरिका आणि जपानने म्हटले आहे. इतर देशांसोबत झालेल्या अणू व क्षेपणास्त्रसंबंधी झालेल्या कराराचा विचार करून उत्तर कोरियाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत; असे आवाहनही करण्यात आले आहे.